मुंबई : खरीप हंगाम २०२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत PMFBY सहभागी होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या विनंतीनंतर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा अर्जाची मुदत वाढवण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२६ साठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
या योजनेसाठी १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुदतवाढ लागू राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ही अंतिम तारीख संपूर्ण राज्यासाठी एकसारखी नसून जिल्ह्यानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे काही जिल्ह्यांसाठी १७ ऑगस्ट, काहींसाठी २० ऑगस्ट, तर काही जिल्ह्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, १० ऑगस्टपर्यंत राज्यात ८१ लाख ४० हजार विमा अर्ज प्राप्त झाले असून, ५२ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालं आहे. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड-रोगांचा प्रादुर्भाव किंवा हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे होणाऱ्या संभाव्य पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी पात्र कर्जदार शेतकऱ्यांनी विहित मुदतीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम तारखेची वाट न पाहता तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याची शेवटची तारीख संपण्यापूर्वीच नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन केले आहे.