पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.  (Pudhari Photo)
मुंबई

Maharashtra Day | 'महाराष्ट्र प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ!' PM मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले

दीपक दि. भांदिगरे

PM Modi Wishes Maharashtra Day greetings

भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्याला आज १ मे २०२५ रोजी ६५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत, महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पीएम नरेंद्र मोदी गुरुवारी, महाराष्ट्र दिनी मुंबई दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज २०२५) उद्घाटन करतील.

''भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याचवेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.'' असे पीएम मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुंबईतील हुतात्मा चौक स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित होते.

तसेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व महाराष्ट्रवीरांना आदरांजली अर्पण केली. ''मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा ६५ वा वर्धापनदिन साजरा करत असताना, आज संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना आणि महाराष्ट्रप्रेमींना अभिमान आहे की, आपली राजधानी मुंबई देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरली आहे आणि महाराष्ट्र हे सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जात आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम राखत असताना ‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा आपण दृढनिश्चय करूया.'' असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT