मुंबई : माणसाची प्रगती केवळ माहिती-तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही, तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांनासुद्धा महत्त्व द्यावे लागेल. मानवाला रोबो बनवायचे नाही, तर समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. क्रिएटिव्ह व्यक्ती मानवातील ऊर्जा आणि सर्जनशील क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनवावे, असे आवाहनदेखील मोदी यांनी केले.
प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जागतिक द़ृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज्) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते.1 ते 4 मेदरम्यान चालणार्या या परिषदेत 90 देशांमधील तब्बल 10 हजार प्रतिनिधी सहभागी झाले असून, विविध सरकारांचे प्रतिनिधीही उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. चार दिवसांच्या या परिषदेत द़ृकश्राव्य मनोरंजन क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ विविध परिसंवादांत सहभागी होणार आहेत.
भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. भारताच्या प्रत्येक गावात कथाकथनाची स्वतःची पद्धत आहे. या लोककथांमधून पिढ्यान्पिढ्या आपला इतिहास आणि वारसा प्रवाहित झाला. आमच्या पर्वतांमध्ये संगीत आहे, येथील नद्या कायम गुणगुणत असतात. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ भारतीय परंपरेत आहे. आमच्याकडे जगाला देण्यासाठी हरतर्हेचा कंटेंट (आशय) आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, ‘क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड’ हे स्वप्न साकार करण्याची, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ‘वेव्हज्’च्या व्यासपीठावरून जगभरातील गुंतवणूकदारांना साद घातली. भारताचे खाद्यपदार्थ जगभरात पोहोचले आहेत. भारतीय खाणे जसे पोहोचले तसे भारतीय गाणेदेखील जग ऐकू लागेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट 430 अब्ज डॉलरहून अधिक असून, पुढील 10 वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज् परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आज जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशावेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा आहे. हा खजिना जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवणे आणि येणार्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
गुवाहाटीचे संगीतकार असो की, पंजाबचे सिनेनिर्माते हे सारे आता भारताच्या अर्थव्यवस्थेत नवीन तरंग निर्माण करत आहात. क्रिएटिव्हिटीची लाट आणत आहेत. या मेहनतीत केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे. तुमच्या संकल्पना आणि विचारांना इथे मोल असेल, तुमच्या स्वप्नांना सामर्थ्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला एक असे व्यासपीठ देऊ जिथे क्रिएटिव्ह आणि कोडिंग हातात हात घालून चालतील. सॉफ्टवेअर आणि स्टोरीटेलिंग एकत्र येतील. या व्यासपीठाचा उपयोग करा, मोठी स्वप्न पाहा. ती पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकद लावा. माझा तुमच्यावर विश्वास आहे. कंटेंट क्रिएटरवर विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले.
112 वर्षांपूर्वी 3 मे 1913 रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय सिनेमा प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी त्याची निर्मिती केली. ‘रुस’मध्ये राज कपूर, ‘कान’ सत्यजित रे आणि ऑस्करमधील ‘आर.आर.आर’च्या यशातून भारतीय सिनेमा जगाच्या कानाकोपर्यात पोहोचल्याचे सिद्ध होत आहे. आज 100 पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता उपशीर्षकासह भारतीय कंटेंट पाहतात, हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
वेव्हज्मुळे जागतिक पातळीवरील कंटेंट निर्मात्यांसोबत आपला संपर्क प्रस्थापित होणार आहे. ही जागतिक मंडळी जेव्हा भारताशी जोडली जाईल, भारताच्या कथा ऐकतील तेव्हा त्यांना त्या कथा आपल्याच भूमीतील असल्याचा अनुभव येईल. आज स्क्रीनचा आकार छोटा होत असला तरी त्याची व्याप्ती मोठी होत आहे, अमर्याद झाली आहे. स्क्रीन मायक्रो होत आहे; पण मेसेज मेगा होत आहे. भारतीय खाद्यपदार्थ जगाची पसंत होत आहे, तसेच आता भारताचे गाणेही जगाची ओळख बनेल. भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी ‘जीडीपी’त योगदान वाढवू शकते. भारत फिल्म प्रॉडक्शन, संगीत, फॅशनचा ग्लोबल हब होत आहे.
भारताच्या कानाकोपर्यात हजारो कथांचा प्रवाह वाहतो आहे. या कथांमध्ये विज्ञान आहे, रंजकता आहे. या कथा जगासमोर मांडणे ही वेव्हज्ची मोठी जबाबदारी आहे. भारताच्या कानाकोपर्यात दडलेल्या प्रतिभेला व्यासपीठ दिल्यास जगही त्याचे कौतुक करेल. जगभरातून भारतात शुभविचार आले. भारतीय संस्कृतीच्या मुक्तविचारांचे आणि स्वागतशील, स्वीकारशीलतेचे ते प्रमाण आहे. इथे पारसी आले आणि ते अभिमानाने राहत आहेत. ज्यू आले आणि भारताचे झाले. या वेव्हज् परिषदेतही अनेक देशांतून प्रतिनिधी आले असून, त्यांची प्रत्येकाची स्वतःची संस्कृती आहे. कलेचे स्वागत करणे, त्यांचा सन्मान करणे ही आपल्या संस्कृतीची शक्ती आहे.
उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेत वेव्हज् आयोजनाचा उद्देश सांगितला. एम. एम. किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागतगीत सादर केले. वेव्हज् सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस. एस. राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमीर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू नारायण आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमामधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल
‘क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड’ साकारण्याची हीच वेळ
आपले खाणे पोहोचले, आपले गाणेही जगाला आवडेल
भारताला कथांचा मोठा वारसा; आपल्या गोष्टी जगाला सांगूया