मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच केर स्टार्मर यांनी भारताशी फ्री ट्रेड अॅग्रीमेंटचा ऐतिहासिक करार केला आणि त्या करारानंतर स्टार्मर यांनी पहिल्यांदाच भारतात यायची इच्छा व्यक्त केली तेंव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थान निवडले ते मुंबईचे ! आज क्षेपणास्त्रविक्रीबाबत मोदी आणि स्टार्मर यांनी करार तर केलाच शिवाय युक्रेन आणि गाझा या अशांत परिसरात शांती निर्माण करण्याच्या योजनांबद्दल चर्चा केली .
राजभवनात अरबी समुद्राच्या साक्षीने दोन्ही नेत्यांनी विस्तीर्ण हिरवळीवर छायाचित्रे काढली तेंव्हा दोन्ही देशातील बडे उद्योगपती , शिक्षणतज्ञ आणि निवडक पत्रकारांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते . मोदींनी ब्रिटनशी असलेली भारताची मैत्री वृध्दींगत होत राहील असे नमूद केले तर स्टार्मर यांनी जागतिक पातळीवर भारताचे न्याय्य स्थान मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर भारताला कायमचे स्थान मिळावे यासाठी आपण पुढाकार घेवू असेही ते म्हणाले. भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल ब्रिटनचे शिष्टमंडळ आश्चर्य व्यक्त करीत होते. ब्रिटीश पेट्रोलियम, ब्रिटिश एअरवेज यासह तेथील मोठया कंपन्याचे प्रमुख यावेळी हजर होते तर भारतातील निमंत्रितांमध्ये टाटा उद्योगसमुहाचे चंद्रशेखरन ,आनंद महिंद्र यांचा समावेश होता. नरेंद्र मोदी आणि केर स्टार्मर यांनी करारांच्या औपचारिकतेपूर्वी वाद्यांचे मंदसंगीत सुरु असताना एका टेबलवर संवाद साधला . राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल , केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे दोघे भारतीय त्या टेबलवर होते . महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सल्लागार वरुण चंद्रा यांनीही विविध विषयांवर ब्रिटीश शिष्टमंडळाशी चर्चा केली .
राजभवनाचा ब्रिटीशकालीन इतिहास जाणून घेण्यात स्टार्मर यांच्यासह ब्रिटनमधील निमंत्रितांना रस होता . अमेरिकेने लागू केलेल्या टेरिफनंतर भारत व्यापारउदिमासाठी नव्या देशांच्या शोधात असताना ब्रिटनशी नवे मैत्रीपर्व सुरु झाले असून त्याचे प्रतिबिंब आज दिसत होते . यापूर्वी कोणत्याही देशाच्या प्रमुखाशी मुंबईत करार झाले नव्हते .
पंतप्रधान स्टार्मरांची सर्वदूर छायाचित्रे ! गेले दोन दिवस ब्रिटीश पंतप्रधान केर स्टार्मर मुंबईत मुक्कामाला आहेत ,तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही . दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर सर्वत्र स्टार्मर यांची छायाचित्रे लावली होती. मुंबईतील कूपरेज मैदान, खैबर उपहारगृह, यशराज फिल्म स्टुडिओ असा प्रवास करत मुंबईचे दर्शन स्टार्मर यांनी घेतले .
वाद्यसंगीत
नविन गंधर्व यांनी सतार, सरोद या भारतीय वाद्यांबरोबरच व्हायोलिन अशा वाद्यांवर भारतीय शास्त्रीय संगीत याबरोबरच बिटल्सची पाश्चिमात्य धून वाजवली गेली.