मुंबई/मीरा रोड/कोपरखैरणे : मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यावर गुंतवणूकदारांना आठवड्याला सहा टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून महामुंबईमध्ये विविध ठिकाणी हिऱ्यांच्या दागिन्यांचे दालन थाटणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपली सर्व दुकाने बंद करून पोबारा केला. त्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या हजारो नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान आज (दि. ७) या कंपनीच्या दादरमधील टोरेस बँड कार्यालयातील महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा यांना दादर शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवलेंको, तौफिक रियाज कार्टर, तानिया कसतोवा आणि व्हॅलेंटीना कुमार अशी या पाचजणांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते सर्वजण पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातील तानिया कसतोवा यांना आज पोलिसांनी अटक केली आहे.
या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. मुंबईसह इतर ठिकाणी कंपनीची शाखा असून त्यात सुमारे अडीच ते तीन लाख गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवणुक केली आहे. त्यामुळे आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३१ वर्षांचे प्रदीपकुमार मामराज वैश्य हे खार परिसरात राहत असून त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. जून २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांनी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणुक केली होती. या कंपनीचे दादर येथील जे. के सावंत मार्ग, टोरेस वस्तू सेंटर इमारतीमध्ये एक कार्यालय आहे. कंपनीने मोजोनाईट हा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतवणुक केल्यास आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना यांच्या सांगण्यावरुन मोजोनाईक खड्यासाठी गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीनंतर त्यांना कंपनीकडून आठवड्याला सहा टक्के व्याजदर दिला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने व्याजदाराची रक्कम देणे बंद केली होती. त्यामुळे ते दादर येथील कंपनीच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना कंपनीला टाळे असल्याचे दिसून आले. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात इतर गुंतवणुकदार आले होते. या गुंतवणुकदारांनाही गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना परतावा दिल्यानंतर कंपनीने त्यांना परतावा देणे बंद केले होते. अशा प्रकारे कंपनीने जून ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आतापर्यंत अनेकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची १३ कोटी ४८ लाख १५ हजाराची फसवणुक केली होती. सायंकाळी या गुंतवणुकदारांनी दादरच्या कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला होता. त्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रदीपकुमा वैश्य यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कंपनीचे संचालक, सीईओ, महाव्यवस्थापक आणि स्टोर इंचार्ज अशा पाचजणांविरुद्ध गुंतवणुकदारांकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीचे अनेक शाखा मुंबईसह नवी मुंबई आणि इतर शहरात आहे. तिथे अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केल्याचे बोलले जाते. कंपनीत आतापर्यंत अडीच ते तीन लाख गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केली असून फसवणुकीचा हा आकडा साडेचारशे ते पाचशे कोटी असल्याचे बोलले जाते. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.