मुंबई

प्लास्टिक सर्जरीने मानेतून काढली सव्वादोन किलोची गाठ

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  सायन रुग्णालयात १५ वर्षाच्या मुलाच्या मानेवर जन्मजात असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करून सव्वा दोन किलोची गाठ काढून प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी १५ वर्षीय तरुणाच्या मानेवर होती. डाव्या बाजूला जन्मापासून गाठ असल्याने उपचाराकरीता आणण्यात
आले. मानेवर असलेली गाठ हळूहळू वाढत होती. मात्र त्याचा रुग्णास त्रास नव्हता. रुग्णाची तपासणी केल्यानंतर ही गाठ २२ सेंटीमीटर x ३० सेंटीमीटर इतकी वाढली होती. या गाठीमुळे रुग्णाची श्वसन नलिका मूळ जागेपासून उजव्या बाजूला पूर्णपणे झुकली सुदैवाने रुग्णास श्वासोच्छवासास त्रास होत नव्हता. रुग्णाच्या रक्त आणि इतर तपासणी केल्या. एमआरआयमध्ये ती गाठ म्हणजे 'लिम्फॅटिक सिस्टिम' व रक्त वाहिन्या यांचे जाळे असल्याचे समजले.

ही गाठ मानेतील एक मुख्य रक्त वाहिनी (नीला) म्हणजेच 'इंटर्नल जगुलर व्हेन' या शिरेपासून वाढत होती. ही गाठ जवळजवळ सव्वा दोन किलो वजनाची होती. आता गाठ काढल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून लवकरच तो पूर्णपणे बरा होईल, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

ही शस्त्रक्रिया प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुकुंद जगन्नाथन, डॉ. अमरनाथ •मुनोळी, सी.वी.टी.एस. सर्जन डॉ. जयंत खांडेकर, व्हॅसक्युलर इंटरनॅशनल रेडिओलॉजीचे डॉ. विवेक उकर्डे, भूलतज्ञ डॉ. शकुंतला बसंतवानी यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. गेल्या आठवड्यात ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अंदाजे साडेसहा तास सुरू होती. गळ्याभोवती असणाऱ्या इतर अतिशय महत्त्वाच्या रक्त वाहिन्या, चेतापेशी आणि मांसपेशी यांना कुठेही धक्का न लावता कौशल्याने ही शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली.

SCROLL FOR NEXT