मुंबई : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने मोठा दणका दिला. आरोपीचे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने 26 वर्षीय आरोपीला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पाच वर्षांपूर्वी दहिसर येथे ही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती.
9 ऑगस्ट 2020 रोजी दहिसर येथील एका झोपडपट्टी वस्तीत राहणारा 7 वर्षांचा मुलगा सार्वजनिक शौचालयात गेला होता. त्या मुलाला शेजारी राहणार्या 26 वर्षीय तरुणाने गाठले आणि त्याचे अपहरण करुन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित अल्पवयीन मुलगा संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक शौचालयात गेला होता. बराचवेळ झाल्यानंतरही तो तेथून घरी परतला नाही म्हणून मुलाच्या आजीने शोध सुरू केला होता. आजीने हाक दिली असता आरोपीच्या घराजवळ मुलाने हाकेला उत्तर दिले. तेथे आजी गेली असता तिला अल्पवयीन मुलगा आणि आरोपी दोघे नग्न अवस्थेत आढळले होते. स्वतःच्या कृत्याचा उलगडा होण्याच्या भीतीने आरोपी पलंगाखाली लपला होता. त्याने जबरदस्तीने घरी नेले आणि अत्याचार केल्याचे पीडित मुलाने सांगितले.
मुलाच्या जबाबावरुन घटनेच्या दुसर्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी पीडीत मुलगा व आजीची साक्ष तसेच इतर पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला अपहरण व अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपावरुन दोषी ठरवले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला झालेला पश्चात्ताप तसेच आधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली नाही. तथापि, आरोपीचे कृत्य घृणास्पद आहे. आरोपी तरुणाला कोणत्याही प्रकारची दया दाखविण्यास तो पात्र नाही, असे निरीक्षण नोंदवत विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
या घटनेचा 7 वर्षांच्या मुलाच्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यासाठी कोणतीही भरपाई पुरेशी असू शकत नाही. मुलाच्या प्रतिष्ठेचा झालेला अपमान भरपाईच्या माध्यमातून परत करता येणार नाही, असे न्यायाधीशांनी नमूद केले. यावेळी आरोपीला ठोठावलेल्या एकूण दंडाच्या रकमेपैकी 30 हजार रुपये मुलाला भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले. तसेच सरकारी योजनेनुसार पीडित मुलाला अतिरिक्त भरपाई देण्यासाठी हे प्रकरण जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडे पाठवले.