नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वयंभू असल्यानेच जनता उद्धव ठाकरेंच्या मागे आहे.केवळ शेंदूर फासलेल्या दगडांना लोक वाकून नमस्कार करीत नाही,असा टोला गुरूवारी संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. राज ठाकरे यांच्या स्वयंभू वक्तव्याचा उल्लेख करीत ते म्हणाले, आम्ही आहोतच स्वयंभू. म्हणूनच जनता ठाकरे गटासोबत आहे. काही जण दगडांना शेंदूर फासतात आणि लोकांना सांगतात यांना देव म्हणा. पंरतु, लोक अशा दगडांना नमस्कार करत नाही. स्वयंभू नेते, देवानांच तो मान मिळतो.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ठाकरे घराणे हे स्वयंभू आहे. त्यामुळे स्वयंभू देवतांप्रमाणे ठाकरे कुटुंबाला मान मिळतो. यामुळे त्यांना पोटदुखी होत असेल तर सांगावे, आमच्याकडे त्यावर उपचार आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. कर्नाटक विधानसभा निकालानंतर साधारणता १३ मे नंतर राज्यातील राजकीय घडामोड सुरू होतील, असे सूचक विधान देखील त्यांनी केले. कर्नाटक मध्ये भाजपचा दारूण पराभव होईल, असा दावाही राऊत यांनी केला.
दरम्यान राऊत यांनी पत्रकार परिषदेतून गृहमंत्र्यांवरही टीका केली. मतदारांना देशाच्या गृहमंत्र्यांनी दिलेली धमकी त्यांना शोभत नाही.भाजपला मते द्या नाहीतर दंगली घडवू,अशी धमकीच अमित शहांनी दिली असल्याचा असा दावा शिवसेना खासदार संजय राउत यांनी गुरूवारी केला.कर्नाटकचे आताचे कल हे स्पष्टपणे कॉंग्रेसच्या बाजूने दिसत आहेत. भाजपचा या राज्यात पराभव होईल.देशाचे गृहमंत्री सध्या कर्नाटकमध्ये प्रचार करत आहे.पंरतु,राज्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास कर्नाटकमध्ये दंगली होतील,असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केल्याचे राऊत म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत यांनी दिल्लीत जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली.मलिकांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटी दरम्यान उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे कळतेय. भेटी दरम्यान राऊत यांनी मलिकांना मुंबई दौऱ्याचे तसेच मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे.'भविष्यात परिवर्तन कसे आणता येईल, त्यात त्यांचे योगदान काय असेल' यावर भेटीदरम्यान चर्चा करण्यात आल्याची माहिती राऊत यांनी दिली.