Arrested Pudhari
मुंबई

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये एमडी बनविण्याचा कारखाना; पायधुनी पोलिसांकडून तिघांना अटक

४३५ ग्रॅम मेफेड्रोन, १३.०५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना पायधुनी पोलिसांनी अटक केली. कपिल गुलशन अरोरा (३९), मोहम्मद आसिफ इक्बाल शेख (४४) आणि सय्यद अस्लम शेख (३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून तब्बल ४३५.१० ग्रॅम मेफेड्रोन, अंदाजे १३ लाख ५ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांनी उल्हासनगर येथील एका घरातून एमडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त केले आहे.

पायधुनी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला ५ सप्टेंबर रोजी गस्तीदरम्यान जंजीकर स्ट्रीट, दुसरा माळा, हॉटेल झोडिया, मशीद बंदर पश्चिम परिसरात काही व्यक्ती मेफेड्रोन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत दोन जणांना एमडीसह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास पुढे नेत असताना पोलिसांनी आणखी एका आरोपीला पायधुनीतील धोबी गल्ली परिसरातून अटक केली.

आरोपींची चौकशी केली असता एमडीची निर्मिती उल्हासनगर, ठाणे येथील एका घरातून केली जात असल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करून एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

मुंबईत अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीमागे केवळ विक्रेतेच आहेत की त्यामागे आणखी मोठे जाळे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. एमडीच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य कुठून आणले जात होते, तयार केलेला अमली पदार्थ मुंबईतील कोणत्या भागात वितरित केला जात होता आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग-२) रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT