Tatkare Pawar clash | सुनील तटकरे यांच्याविरोधात पवारांचे ‘भावबंधन’ 
मुंबई

Tatkare Pawar clash | सुनील तटकरे यांच्याविरोधात पवारांचे ‘भावबंधन’

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या वर्चस्वयुद्धात माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पार्थ, जय आणि रोहित हे तिसर्‍या पिढीतील पवार एकत्र आले आहेत. अजित पवार यांना कायम साथ देणारे तटकरे यांनी आमदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे सुरू केले, असा पार्थ पवार गटाचा संशय आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदच्युत केले असावे, असा अंदाज आहे.

अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप रोहित पवार सातत्याने करत आहेत. त्यांनी संशयाची सुई पटेल, तटकरे यांच्याकडे वळवली असतानाच आता तटकरे यांना पदच्युत करणारे निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र बाहेर कसे आले, त्यामागे पार्थ आणि रोहित यांचे संगनमत आहे, अशी माहिती एका तटकरे समर्थकाने दिली.

पत्र बाहेर कसे पडले : तटकरे

पत्र बाहेर कसे पडले हे विचारण्यासाठी शुक्रवारी तटकरे यांनी कार्यालय प्रमुख परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे यांना प्रश्न विचारला, अशी चर्चा आहे. गर्जे यांनी आपला तटकरे यांच्याशी कायम संवाद असतो असे सांगत अधिक काही बोलण्यास नकार दिला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र पार्थ यांच्या सांगण्यामुळे जाहीर झाले, असा ठपका गर्जेवर ठेवण्यात आला आहे.

पटेल, तटकरे यांची पकड कमी करण्यासाठी पत्र फोडल्याचा आरोप

खासदार पार्थ पवार यांनी रोहित पवार यांची मदत घेतल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र दोन महिन्यांनंतर अचानक उगवण्यामागे तटकरे आणि पटेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील पकडीला कमी करण्यासाठी पवारांच्या तरुण पिढीने चालवलेले प्रयत्न आहेत. या पक्षावर मराठा समाजाची पकड राहायला हवी. व्यापारी आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या दावणीला हा पक्ष बांधला गेला तर अजित पवार यांना मानणारे कित्येक मतदार दूर जातील, अशी भीती पार्थ, जय आणि रोहित पवार यांच्या मनात असल्याची चर्चा आहे.

वादळ शमविण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आपल्याकडे वळवतील अशी भीती अजित पवार यांच्या कुटुंबाला वाटते असे एका निकटवर्तीयाने सांगितले.

सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौर्‍यात तटकरे दूरच

यासंदर्भात सुनील तटकरे यांना दिल्ली दौर्‍यातून दूर ठेवणे सुनेत्रा पवार या राज्यसभेत गेल्या असताना लोकसभेतील एकमेव सदस्य असलेल्या अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी तेथे नसणे हा मोठा संकेत मानला जातो आहे. तटकरे हे अजित पवार यांचे जीवाभावाचे मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांनी पक्षावर वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका अजित पवार यांच्या कुटुंबीयांना आहे.

आमदारांशी संपर्क साधताना सुनील तटकरे स्वतःला केंद्रस्थानी मानत असल्याची तक्रार अजित पवार यांना मानणार्‍या पुण्यातील काही आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

राष्ट्रवादीचे ते पत्र बाहेर आलेच कसे?

तटकरे हे अजित पवार यांच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचे मित्र असल्याने सुनेत्रा पवारांना त्यांना नाराज करायचे नाही, मात्र आपल्या निर्णयानुसार पक्ष चालेल, हेही त्यांना दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पद नसलेले पत्र आयोगाला पाठवले गेले. हे पत्र राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लिपिक वगळता अन्य कुणालाही माहीत असण्याची शक्यता नाही. हे पत्र अचानक समोर आले कसे आणि तो मुद्दा रोहित पवार यांनी उचलला कसा, याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT