पुढारी ऑनलाईन डेस्क: विधानसभेच्या मतांवर शंका घेत, इव्हीएम विरोधात बंड पुकारलेल्या मारकडवाडीमधील ग्रामस्थांनी आज (दि.८) 'EVM हटाव, लोकशाही बचाव' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी "निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, EVM विरोधी भूमिकेमुळे, ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होणे आश्चर्यकारक आहे, निवडणूक EVM वर नको, तर मतपत्रिकेवर घ्यायला हवी", अशी मतं व्यक्त केली. यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे, जरा डोळे उघडून नीट वाचा. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले".
"यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल", असे देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे.