मुंबई ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यंदाच्या संकलित मूल्यमापन चाचणी-1 (पॅट) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या चाचण्या 10, 11 व 13 ऑक्टोबर रोजी होणार आहेत.
गेल्या शैक्षणिक वर्षी पॅट परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याच्या नियोजनावरून एससीईआरटी वर प्रचंड टीका झाली होती. शाळांचा अधिकार थेट परिषदेने घेतल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यंदा तो अनुभव लक्षात घेऊन शाळांना सहामाही परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
पॅट परीक्षा ही दहावी-बारावीप्रमाणे उच्चस्तरीय नसून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि अध्ययनातील अडथळे ओळखण्यासाठीची साधने असल्याचे स्पष्टीकरण एससीईआरटीने दिले आहे. या चाचणीच्या प्रश्नपत्रिका 5 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हास्तरावर वितरित केल्या जाणार आहेत. गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि तालुका समन्वयक यांच्या देखरेखीखाली प्रश्नपत्रिका थेट शाळांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे म्हटले होते. मात्र अनेक शाळांत मिळाल्या नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.
राज्यभर ही परीक्षा चालू होणार असली तरी यावर्षीही प्रश्नपत्रिकांच्या उपलब्धतेवर गोंधळ आहे. अनेक शाळांना अद्याप प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या नाहीत, तर काही ठिकाणी अपुर्या प्रमाणात मिळाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 60 मिनिटांची, तिसरी ते सहावीपर्यंत 90 मिनिटांची तर सातवी-आठवीसाठी 120 मिनिटांची परीक्षा होईल. प्रत्येक विषयात लेखी आणि मौखिक दोन्ही घटक असतील. गुणपद्धतीनुसार दुसरीसाठी 30, तिसरी-चौथीसाठी 40, पाचवी-सहावीकरिता 50 आणि सातवी-आठवीकरिता 60 गुणांची चाचणी होणार आहे. पहिली भाषा (मराठी किंवा अन्य माध्यमानुसार), गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांमध्येच पॅट घेण्यात येणार आहे.