पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचे संकेत 
मुंबई

Parth Pawar : पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचे संकेत

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी घोषणेची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

चंदन शिरवाळे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची नियुक्ती होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्यांचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षामध्ये नेतृत्व आणि दमदार निर्णय घेईल अशा नेत्याची पोकळी निर्माण झाली आहे. या पक्षाचे काही नेते राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षांपासून असले तरी मतदारसंघाबाहेर त्यांचा प्रभाव नाही. महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारणावर छाप पाडेल, अशा नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभाव आहे. मध्यंतरी एका बिगरमराठी नेत्याच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वावडी उडवून देण्यात आली होती. मात्र, पक्षातील आमदार आणि जनतेनेही तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे ते नाव आपोआप मागे पडले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, असा मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये आहे. 30 ते 35 आमदार, विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनीही यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे त्यांनी आणि पक्षातील निवडक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पार्थ पवार यांचे नाव सुचविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदारही आहेत. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत आहे. आता त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांना पुढील सहा महिन्यांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार पार्थ यांना या जागेवर पाठविले जाईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांऐवजी त्यांना सहा वर्षांचा कार्यकाळ असलेल्या जागेवरूनच राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश सुलभ होईल. पार्थ पवार यांनी याआधी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना अपयश आले होते. आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना पूर्णवेळ राजकारणात आणण्यास पवार कुटुंबानेही सहमती दर्शवली आहे.

ही तयारी 2029 च्या लोकसभेची

सुनेत्रा पवार यांना घराची जबाबदारी सांभाळत असताना देशभरात दौरे करणे शक्य नाही. पार्थ यांच्यावर आतापासून जबाबदारी सोपविल्यास 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगला फायदा होईल, असाही मतप्रवाह आहे. त्यादृष्टीने पक्षात हालचाली सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT