मुंबई ः नवजात बाळाच्या खरेदी-विक्रीप्रकरणी चौघांना बुधवारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. यात बाळाच्या आई-वडिलांसह दोन महिलांचा समावेश आहे. नजिमा अस्लम शेख ऊर्फ नसरीन, फातिमा मेहमूदअली, सुमया इरफान खान आणि इरफान खान अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. समीर ऊर्फ नबील शेख हा मुख्य आरोपी असून तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
यातील तक्रारदार महिला ठाणे येथे राहत असून तिचे पती समाजसेवक आहे. मे महिन्यांत त्यांना समीर नावाचा एक व्यक्ती नवजात बाळाची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी समीरची भेट घेऊन त्यांना एक बाळ देण्याची विनंती केली होती. यावेळी समीरने त्यांना बाळ देण्याचे आश्वासन देऊन त्यासाठी चार लाखांची मागणी केली होती. आगाऊ म्हणून त्याने त्यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले होते.
बुधवारी समीरने त्यांना फोन करुन एका मुलाला तिच्या परिचित महिलेने जन्म दिला असून या बाळासाठी त्यांना साडेपाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांनी तयारी दर्शवून त्याला गोवंडीतील शिवाजीनगर, लोटस जंक्शनजवळ बोलाविले होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे बुधवारी तिथे नजिमा आणि फातिमा या दोघीही एका बाळाला घेऊन आल्या होत्या. बाळासह बाळाची फाईल त्यांना देऊन त्यांनी त्यांच्याकडे साडेपाच लाखांची मागणी केली होती. याच दरम्यान पोलिसांनी तिथे कारवाई करुन दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या जबानीवरुन पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत या दोन्ही महिलांसह बाळाच्या आई-वडिल अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईची माहिती मिळताच समीर हा पळून गेला होता. त्याचा आता पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर चारही आरोपींना गुरुवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
चौकशीत फातिमा आणि नजिमा या दोघीही गोवंडीतील रफिकनगर परिसरात राहत होत्या. त्या समीरच्या संपर्कात होत्या. त्याच्या सांगण्यावरुन त्या दोघीही बाळाची विक्रीसाठी तिथे आल्या होत्या. चौकशीत ते बाळ सुमया आणि इरफान यांचे होते. त्यांनीच स्वतचे बाळ समीरला विक्रीसाठी दिले होते. या बाळाच्या खरेदी-विक्रीतून त्यांना साडेपाच लाख रुपये मिळणार होते. ही रक्कम ते सर्वजण आपसांत वाटून घेणार होते.