मुंबई : परळ येथील जेरबाई वाडिया रुग्णालयाच्या गेट क्रमांक पाचसमोर कारच्या धडकेने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (6 मार्च) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. अहमद रजा अमीर खान असे मुलाचे नाव असून भोईवाडा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमीर खान हा कुर्ला येथे राहत असून तो फॅब्रिकेशनचे काम करतो. त्याला पाच वर्षांची फातिमा नावाची एक मुलगी असून तिला श्वास घेण्याचा त्रास होता. 26 फेब्रुवारीला त्याने तिला तपासणीसाठी वाडिया रुग्णालयात आणले होते. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर फातिमाला तातडीने ॲडमिट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिला तिथे ॲडमिट करुन तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. या कालावधीत
अमीर, त्याची पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा अहमद रजा हे तिथेच राहत होते. शुक्रवारी सकाळी अमीर हा त्याच्या नातेवाईकाची वाट पाहत होता. तर अहमद रजा हा रस्त्यावर खेळत होता. याचदरम्यान एका कारने त्याला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर कारचालक पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.