मुंबई : पक्षाघात झालेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना त्या ठिकाणी उपचार मिळणे दुरापास्त असते. हे लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ हा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण आणि दुर्गम भागांतील रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्येच उपचार मिळू शकतात, यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.
आरोग्य सेवा आयुक्तालयात झालेल्या प्राथमिक बैठकीत या महत्त्वाकांक्षी योजनेवर चर्चा करण्यात आली. पक्षाघाताच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वेळेत तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना कायमस्वरूपी पक्षाघाताचा धोका निर्माण होत असल्याची बाब बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
या संकल्पनेनुसार केईएम रुग्णालय येथे मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार असून जिल्हा आणि तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये दुय्यम केंद्रे कार्यरत राहतील. संगणकीय आणि दूरसंचार प्रणालीच्या माध्यमातून मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या मदतीने स्ट्रोकवरील जटिल उपचार प्रक्रिया दूरस्थ पद्धतीने पार पाडतील. केईएम रुग्णालयाचे वरिष्ठ हायब्रिड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची प्राथमिक चाचणी आणि नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली. राज्यात सुरू करण्यात येणार्या 11 कॅथलॅबपैकी पाच केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्याचा विचार आरोग्य विभाग करत आहे.
ग्रामीण भागात एखाद्याला पक्षाघात झाल्यास मोठ्या शहरात धाव घ्यावी लागते. या धावपळीत रुग्ण दगावण्याची अथवा त्याच्या मेंदूचा मोठा भाग निकामी होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रात एक लाखांमागे सुमारे 152 पक्षाघाताचे रुग्ण आढळत आहेत. दरवर्षी ही संख्या 20 हजारांच्या घरात जाते. मुंबईत दर महिन्याला या विकाराचे 1800 ते 2000 रुग्ण आढळतात. पुण्यात वर्षाला दहा हजार नागरिकांना पक्षाघाताचा झटका बसतो. कोल्हापूरमध्ये दर महिन्याला पक्षाघाताचे 336 रुग्ण आढळतात.