मुंबई : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या व्ही. राधा समितीने दुसऱ्या अहवालात पेपरफुटी आणि संघटित परीक्षा गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्यांना सात ते दहा वर्षांचा कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड, संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल समितीने २३ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला सादर केला. परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी तीनस्तरीय कमांड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारसही या समितीने केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रिया सुधारण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती जाहीर केली होती. ४ सप्टेंबर रोजी स्थापन झालेल्या या समितीने ५ नोव्हेंबर रोजी आपला अंतरिम अहवाल सादर केला होता. त्यामध्ये एमपीएससीच्या गट क संवर्गातील पदांची संख्या पाच हजारवरून १६ हजारपेक्षा अधिक करण्याची शिफारस करण्यात आली होती. समितीने दुसऱ्या अहवालात परीक्षा गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याची तसेच प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची शिफारस केली आहे.
परीक्षा देणाऱ्यांना शुल्क परत
परीक्षार्थींना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे संपूर्ण शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच जर काही कारणाने परीक्षा रद्द झाली तर आणि उत्तरतालिकेवरील (आन्सर की) उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास त्याने भरलेले हरकत शुल्कही परत मिळावे, असे अहवालात सुचविले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांवर नियंत्रणाची जबाबदारी
परीक्षा व्यवस्थेतील प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर परीक्षा आयोजनाच्या देखरेखीची आणि परीक्षा पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने पार पाडण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची शिफारसही समितीने केली आहे. परीक्षा केंद्रांची निवड आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र 'व्हेन्यू बँक' तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये पायाभूत सुविधा, आवश्यक सोयी आणि सुरक्षेचे निर्धारित निकष पूर्ण करणाऱ्या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.
नागपूर अधिवेशनात कठोर कायदा करणार परीक्षा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यमान कायदा अधिक कडक करण्याची शिफारस समितीने केली आहे. राधा समितीच्या दुसऱ्या अहवालाचे मी स्वागत करतो. आगामी नागपूर अधिवेशनातच हा कठोर कायदा सादर करून तो मंजूर करून घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. उमेदवारांमध्ये परीक्षेबाबत गांभीर्य राहावे यासाठी सुरुवातीला परीक्षा शुल्क आकारले जावे. मात्र, जे उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसतील, त्यांना आर्थिक भार पडू नये म्हणून त्यांचे शुल्क परत करण्याची महत्त्वपूर्ण शिफारसही समितीने केली आहे.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री