Ganeshotsav 2026 Mumbai to Konkan traffic
पनवेल: गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांची संख्या वाढताच पनवेलमध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पाहायला मिळाले. जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पळस्पे पुलाच्या परिसरात अवजड वाहने तब्बल तीन रांगांमध्ये उभी करण्यात आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. या कोंडीचा फटका पुलापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत जाणाऱ्या वाहनांना बसला.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होत आहेत. शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढली आणि त्यानंतर हळूहळू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पळस्पे पुलाच्या परिसरात पोहोचण्यापूर्वीच शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती.
या कोंडीत खासगी प्रवासी बस, एसटी महामंडळाच्या बसेस तसेच मोठ्या संख्येने कार आणि इतर हलकी वाहने अडकली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने पळस्पे पुलाच्या परिसरात मोठ्या संख्येने अवजड वाहने थांबविण्यात आली होती. मात्र, ही वाहने महामार्गावर तीन रांगांमध्ये उभी राहिल्याने उपलब्ध रस्त्याचा मोठा भाग व्यापला गेला आणि कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीचा वेग मंदावला.
एकीकडे कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि दुसरीकडे महामार्गावर थांबविण्यात आलेली अवजड वाहने यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढत गेली. वाहतूक पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात वाहनांची संख्या वाढल्यानंतर या नियोजनावर मोठा ताण आल्याचे दिसून आले. कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना बराच वेळ महामार्गावरच थांबावे लागले. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कुटुंबांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने प्रवासी आणि बसेस रस्त्यावर अडकल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.
गणेशोत्सवाच्या पुढील दिवसांत कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पळस्पे पुलाच्या परिसरात अवजड वाहने थांबविताना मुख्य वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग अथवा नियोजित थांबा तयार करण्याचे आव्हान आता वाहतूक पोलिसांसमोर आहे.