Panvel municipal election double voter dispute
शिल्पा नरवडे, पनवेल
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत दुबार मतदारावरुन भाजप- महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. प्रभाग क्रमांक 19 मधील मतदान केंद्रावर एक मतदार मतदानासाठी आला होता. त्याच्यासमोर ‘दोन स्टार’ (**) होते. यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत ‘दुबार मतदार आहे, मतदाराला लॉकअप मध्ये टाका’, अशी मागणी केली. त्यावर भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.
मतदार यादीत संभाव्य दुबार मतदारांपुढे ‘दोन स्टार’ (**) अशी खूण आहे. दुबार मतदारावरुन राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी मतदार याद्यांवरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. राज ठाकरेंनी एका सभेत ‘दुबार मतदार दिसल्यास फोडून काढा’, अशा आशयाचे विधान केले होते.
पनवेलच्या प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळा या मतदान केंद्रावर सकाळी एक मतदार पोहोचला. यादीत त्याच्या नावासमोर डबल स्टार होता. त्या मतदारावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्याला तुरुंगात टाका अशी मागणीच कार्यकर्त्यांनी केली. यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला.
मतदानासाठी आलेल्या मतदाराला अशी धमकी देणं चुकीचं आहे, मतदाराला जाब विचारणारे हे कोण आहेत, वाद निर्माण करुन मतदानात अडथळे आणण्याचा हा प्रकार आहे, असं भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. यावरुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही कार्यकर्त्यांना समज दिली आणि कार्यकर्ते माघारी परतले.
मुंबईतही दुबार मतदाराला थांबवले
मुंबईतील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये सकाळी एक महिला मतदार मतदानासाठी आली. त्याच सुमारास मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे देखील मतदान केंद्रावर पोहोचले होते. महिलेच्या नावासमोर ‘डबल स्टार’ होते. या महिलेला मतदान करण्यापासून थांबवण्यात आले. या महिलेकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगामुळे असे प्रकार घडतायत, असा आरोप यशवंत किल्लेदार यांनी केला.
मतदाराच्या नावासमोर डबल स्टार (**) अशी खूण असेल तर काय करावे?
संभाव्य दुबार मतदारांपुढे डबल स्टार अशी खूण आहे. अशा मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचा अर्ज मतदानावेळी भरून घेतला जाणार आहे.