मुंबई : राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत भगवान गर्जे यांची पत्नी गौरी हिने शनिवारी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ही हत्याच असल्याचा आरोप गौरीच्या माहेरच्यांनी केल्यानंतर आणि तशी तक्रार दिल्यानंतर वरळी पोलिसांनी पती अनंत भगवान गर्जे, नणंद शीतल भगवान गर्जे आणि दीर अजय भगवान गर्जे या तिघांविरुद्ध गौरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गौरीचे वडील अशोक मारुती पालवे हे बीडच्या कालिकानगर, शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी अलकनंदा नर्स असून गौरीने बीडच्या आदित्य डेन्टल कॉलेजमधून बीडीएसचे शिक्षण घेतले होतेे. ती सुरुवातीला सेंट जॉर्ज रुग्णालयात डेंटल असिस्टंट म्हणून काम करत होती. त्यानंतर तिची बदली सायन रुग्णालयात झाली. 7 फेब्रुवारी 2025 रोजी गौरीचे अनंत गर्जे सोबत दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने विवाह झाला होता. अनंत हा अहिल्यानगर, पाथर्डी, मोहोज देवडेचा रहिवासी असून सध्या तो मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा खासगी स्वीय सहायक म्हणून काम करतो.
गौरी आणि अनंत दोघेही मुंबईत काम करत असल्याने लग्नानंतर गौरीही अनंतसोबत वरळीतील जी. एम. भोसले रोडवर, नवीन बीडीडी वसाहत, डी विंगच्या तिसाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 3006 मध्ये राहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासोबत तिचा दीर अजयही होता. लग्नानंतर काही दिवसांनी गौरीचे अनंतसोबत कौटुंबिक वादातून खटके उडू लागलेे. हा प्रकार तिने आईलाही सांगितला होता. मात्र आईने तिची समजूत काढली व वाद न घालण्याचा सल्ला दिला होता.
अनंत गर्जेचे अफेअर?
गेल्या 30 सप्टेंबरला गौरीने तिच्या आईला व्हॉटस्अपवर काही फोटो पाठविले होते. त्यात एका महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता. त्यात या महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेचा उल्लेख होता. या कागदपत्रावरून या महिलेचे अनंतसोबत संबंध असल्याचा संशय गौरीला आला. ही कागदपत्रे तिला घर शिफ्ट करताना सापडली होती. तेव्हापासून ती सतत मानसिक तणावात होती.
आत्महत्या प्रकरण धक्कादायक : मुंडे
शनिवारी संध्याकाळी 6.30 ते 6.45 च्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसर्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे त्याने मला सांगितले. पोलिसांच्या कारवाईत कसर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे. तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
गौरीची हत्याच केली ः वडिलांचा आरोप
गौरीने आत्महत्या केल्याचे समजताच पालवे कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला. ते रात्रीच मुंबईकडे निघाले. वरळी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि अशोक पालवे यांचा जबाब नोंदवला. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा पालवेंनी केला. अनंतचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधावरुन गौरी आणि अनंत यांच्यात वैवाहिक जीवनात कटुता आली होती. पतीच्या अफेसरमुळे गौरी मानसिक तणावात होती. त्या नैराश्यातून तिने जीवन संपविल्याचा आरोप पालवेंनी केला.