मुंबई: नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार पांडूरंग निंबा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषी असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्यातील निमसोड ( ता.कडेगांव) येथील सेवानिवृत्त सहायक फौजदार बबन गणपत जाधव यांनी दिली.
नवी मुंबई येथे पोलीस दलाच्या विशेष शाखेत सहाय्यक फौजदार पांडूरंग निंबा पाटील (५६) ते कर्तव्यावर होते. त्यांना वरीष्ठ अधिकारी हे त्रास देत होते. या गंभीर प्रकरणी पाटील यांनी मला न्याय मिळावा,माझा छळ होऊ नये म्हणून त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्याय मिळावा म्हणून विनंती अर्ज केला होता.
त्या अर्जाची योग्य दखल घेवून पाटील यांना वेळीच न्याय दिला असता तर आज पाटील यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळच आली नसती. म्हणून या घटनेला भारंबे हे सुध्दा जबाबदार आहेत. म्हणून त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मंजुरी मिळावी, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.
पुरावा नष्ट केला जाण्याची शक्यता
पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आठ पानांची सुसाईड नोट लिहिलेली आहे. त्या नोटचा शोध घ्यावा ही नोट गायब करण्यात येऊन पुरावा नष्ट केला जाण्याची शक्यता आहे. तरीपण पाटील यांनी अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे गळफास लावण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात एक नोट लिहीली आहे.
या प्रकरणी या सर्वांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणेस मंजुरी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बबन जाधव यांनी सांगितले.