Agarbatti Market Pudhari
मुंबई

Agarbatti Market: अगरबत्ती निर्मितीतून विठ्ठलभक्तीचा सुगंध; आषाढीत होते कोट्यावधींची उलाढाल

हॅन्डमेड सुवासिक उदबत्तींना मागणी

पुढारी वृत्तसेवा

स्वप्निल कुलकर्णी

मुंबई: आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या सहा दिवसांवर आला आहे. त्यामुळे पंढरपुरातील प्रासादिक साहित्य, भजनी साहित्य, अगरबत्ती आदींची बाजारपेठ सजली आहे. सुवासिक अगरबत्ती बनवण्याचे काम बाराही महिने सुरू असते.

आषाढीसाठी अगरबत्ती व्यावसायिकांनी जोरदार तयारी केली असून पंढरीमध्ये उदबत्ती निर्मितीतून विठ्ठलभक्तीचा सुगंध दरवळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अगरबत्तीच्या उत्पादन आणि विक्रीतून तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे अगरबत्ती विक्रेता व्यापाऱ्यांनी दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले

पंढरपुरात सुवासिक अगरबत्ती आणि धूप बनविणारे लाड, क्षीरसागर, ताठे-देशमुख, देशपांडे, वट्टमवार, पेनूरकर, खंडागळे आदी दहा ते बारा प्रसिद्ध अगरबत्ती उत्पादक आणि व्यावसायिक आहेत. काही उदबत्त्यांना 'हटके' नवी नावेही देण्यात आली आहेत.

दोन ते अडीच हजार रुपये किलो दराच्या नैसर्गिक साधनांचा वापर करून हाताने बनवलेल्या अगरबत्त्या सेंटेड अगरबत्त्यांच्या तुलनेत काहीशा महाग असल्या, तरी आपल्या सुवासाने त्यांनी ग्राहकांना प्रसन्न केले आहे.

अगरबत्त्यांचे नवनवीन प्रकार पंढरपुरातील उत्पादकांनी बाजारात आणले आहेत. पंढरपुरातील या अगरबत्ती उत्पादनाला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा आहे. तीनशे वर्षांपूर्वी तात्याबा ताठे-देशमुख पंढरपुरात कुंकू, बुक्का, अष्टगंध, धूप तयार करत असत.

त्यांनी धूप व सुगंधी द्रव्ये वापरून अगरबत्ती बनवण्यास सुरुवात केली. त्यांचे पुत्र नारायण तात्याबा ताठे-देशमुख यांनी नवा फॉर्म्युला बनवला व ‘ताठे डेक्कनक्वीन’ ब्रँड नावारूपास आणला.

अगरबत्ती उत्पादन व्यवसायात आमची ही सातवी पिढी आहे. हाताने बनवल्या जाणाऱ्या मसाला अगरबत्त्यांची ख्याती आता देश-परदेशातही पोहोचली आहे. अलीकडे सेंटेड अगरबत्ती उत्पादनामध्ये स्पर्धा वाढली आहे; मात्र पंढरपुरात बनणाऱ्या ओल्या मसाल्याच्या अगरबत्त्यांची मागणी अजूनही कायम आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहेत.
- धनंजय लाड, अगरबत्ती उत्पादक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT