Pakistani girl Mumbai airport file photo
मुंबई

Viral Video: "मी खूप घाबरले होते पण…": पाकिस्तानी तरुणीने मुंबई विमानतळावरील 'तो' १० तासांचा सांगितला अनुभव

Pakistani girl Mumbai airport: एका पाकिस्तानी तरुणीला लंडनहून नेपाळला जाताना मुंबई विमानतळावर १० तास थांबावे लागले. यावेळी आलेला अनुभव तिने एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे.

मोहन कारंडे

Pakistani girl Mumbai airport

मुंबई: भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमेवरचा तणाव एकीकडे असताना, भारतीयांचा पाहुणचार आणि माणुसकीचा एक सुखद अनुभव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एका पाकिस्तानी तरुणीला लंडनहून नेपाळला जाताना मुंबई विमानतळावर १० तास थांबावे लागले. पाकिस्तानी पासपोर्ट असल्याने मनात असलेली प्रचंड भीती आणि त्यानंतर आलेला कौतुकास्पद अनुभव तिने एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे.

"पाकिस्तानी पासपोर्ट... भीती तर वाटणारच होती!"

इन्स्टाग्रामवर 'वांझिपा' नावाच्या या तरुणीने तिचा हा प्रवास अनुभव एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे. ती लंडनहून नेपाळला जात असताना मुंबई हे तिचे कनेक्टिंग स्टॉप होते. पाकिस्तानी पासपोर्टवर भारतातून प्रवास करताना सुरुवातीला मनात खूप धाकधूक होती, असे तिने म्हटले आहे. "मी आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रवासावर निघाले होते, पण मुंबईत ट्रान्झिट असल्याने मी काहीशी घाबरले होते. खबरदारी म्हणून मी महिनाभर आधीच 'इंडिगो' विमान कंपनीशी संपर्क साधला होता. विमानतळाच्या बाहेर न पडल्यास पाकिस्तानी नागरिकांना ट्रान्झिटसाठी कोणतीही अडचण येत नाही, असे त्यांनी मला सांगितले होते," असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

संशयास्पद वस्तू... विमानतळावरील 'तो' प्रसंग

मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर १० तास घालवताना तिथल्या सोयीसुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले. मात्र, याच दरम्यान एक छोटासा प्रसंग घडला. सुरक्षा तपासणीदरम्यान तिच्या बॅगेत एक 'संशयास्पद वस्तू' असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्याबद्दल विचारणा करण्यासाठी तिला बोलावण्यात आले. परंतु, ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून एक 'पॉवर बँक' होती. विमान प्रवासाच्या नियमांनुसार तिला ती बॅगेतून बाहेर काढण्यास सांगण्यात आले. हा तांत्रिक मुद्दा सोडल्यास संपूर्ण प्रवास अत्यंत सुखद होता, असे तिने सांगितले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी युजर्सनी त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "पुढच्या वेळी नक्की भारतात या आणि इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या." तर दुसऱ्या एका प्रवाशाने आपला अनुभव सांगताना लिहिले, "मी दोनदा भारतात गेलो आहे आणि तिथल्या लोकांचा स्वभाव बातम्यांमध्ये दाखवतात त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रेमळ आहे."

मुंबईकरांचा प्रेमाचा वर्षाव: "पुढच्या वेळी वडापाव खायला नक्की या!"

मुंबईत आलेल्या या पाहुणीचे स्वागत करताना काही युजर्सनी तिला "मुंबईचा वडापाव आणि मिसळपाव चाखला का?" असा मिश्किल प्रश्नही विचारला आहे. सध्या या तरुणीची ही पोस्ट दोन्ही देशांतील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT