मुंबई : पुढारी वृत्तसेवा
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यांतील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना परिसरात गस्तीसह नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मंत्रालय, विधानसभेसह सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, धार्मिक स्थळे, संवेदनशील ठिकाणी विशेषता पयर्टन स्थळावर अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत विविध हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी अचानक कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली होती. बंदोबस्तात हलर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरातील संवेदनशील व अतिसंवदेनशील परिसरातील बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली आहे.