मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील पागडीधारकांचा रखडलेल्या पुनर्विकासाचा मुद्दा पेटणार आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत असून त्यांना मुंबईतच पाचशे चौरस फुटांच्या घरांच्या चाव्या मिळत आहेत. मात्र शंभर वर्षे जीर्ण इमारतीत हे पागडीधारक जीवन कंठत आहेत. त्यामुळ पुनर्विकासाच्या मागणीसाठी पागडी एकता संघाने 18 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क ते आझाद मैदान मोर्चाची हाक दिली आहे.
न्यायालयाच्या आदेशामुळे दक्षिण मुंबईतील तब्बल 13,800 इमारतींच्या पुनर्विकासला खीळ बसली आहे. त्यामुळे 10 लाखांहून अधिक कुटुंबे पागडीच्या शंभर वर्षांपूर्वीच्या जीर्ण इमारतीत धोकादायकरित्या वास्तव्य करत आहेत. पुनर्विकासाला खीळ घालणारे घरमालक मात्र एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी घेण्यासही तयार नाहीत.
मुंबईची ओळख असणाऱ्या शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ तग धरून असलेल्या मुंबईतल्या हजारो पागडी चाळी आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी 2022 साली 79 अ कायदा अमलात आणला होता. परंतु गर्भश्रीमंत पागडी घरमालकांच्या संघटनेने त्या कायद्याला आव्हान दिले होते. त्यावर म्हाडा इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ सक्षम प्राधिकरण नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने दुरुस्ती मंडळाची 79 (अ) 79 (बी) प्रक्रिया बेकायदेशीर ठरवल्याने पागडी इमारतींच्या पुनर्विकासाला पुन्हा खीळ बसली आहे.
दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाला म्हाडाने सर्वेाच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र पुनर्विकास लांबणीवर पडल्याने पागडीधारकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पागडी एकता संघाने मोर्चाची हाक दिली आहे.
79 (अ) कायद्याप्रमाणेच काही वर्षांपूर्वी पागडी इमारतीतल्या रहिवाशांसाठी 8 (ए) 103 (ब) नुसार शंभर भाडी भरून घराचे मालक व्हा, असा कायदा अमलात आणला गेला होता. परंतु त्यावेळेसदेखील घरमालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. आज चाळीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरदेखील त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे अन्य इमारतीतील भाडेकरूंना जो न्याय मिळतो, तो पागडी भाडेकरूला मिळत नाही, असे पागडीधारकांचे म्हणणे आहे.
राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय यापूर्वी पागडी एकता संघाने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी माझी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मोर्चाच्या ठिकाणी भेट देत रहिवाशांच्या भावना समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देतो, असे सांगितले होते. परंतु आजतगायत एकनाथ शिंदे यांची एकदाही भेट होऊ शकली नाही.
1950 पूर्वीच्या 11 हजार 500 इमारती अतिधोकादायक घोषित करून त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग राज्य सरकारने मोकळा करावा. याव्यतिरिक्त इतर अन्य काही मागण्यांसाठी पागडीधारक येत्या 18 नोव्हेंबर रोजी दादर शिवाजी पार्क येथे एकत्र जमून मोर्चा काढत आझाद मैदानावर धडक देणार आहेत.मुकेश शहा, अध्यक्ष, पागडी एकता संघ