प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता, अरुणा सबाने पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार मानकरी Pudhari Photo
मुंबई

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार चौघांना जाहीर

Padmashri Daya Pawar Smruti Puraskar | प्रा. आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता, अरुणा सबाने मानकरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लेखक शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता यांची निवड झाली आहे. सोबतच 'सूर्य गिळणारी मी' या आत्मकथनासाठी अरुणा सबाने यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत 'बलुतं' पुरस्कार जाहीर झाला आहे.

रविवारी (दि. २०) सायंकाळी ५ वाजता दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा (प.), मुंबई येथे लोकशाहीर संभाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी देशभरातील विविध ठिकाणच्या आदिवासी समूहांमध्ये परंपरेने जपलेल्या संगीत कलेचे दस्तऐवजीकरण आणि त्यांचे सादरीकरण करणाऱ्या गायिका-संशोधक प्राची माया गजानन यांच्या ‘आदिवासी संगीत यात्रा - सप्रयोग आख्यान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र पोखरकर करतील.

यंदाचा हा २६ वा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि चित्रकार शांताराम पवार यांच्या संकल्पनेतू साकारण्यात आलेले सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी दिली. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले आहे.

दया पवार स्मृती पुरस्कारांच्या यंदाच्या मानकरी ठरलेल्या प्रा. आशालता कांबळे या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या, परखड वक्त्या, संविधान मूल्यांच साहित्य लिहिणाऱ्या लेखिका, कवयित्री, समिक्षिका म्हणून परिचित आहेत. गेली चाळीस वर्ष त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हजाराच्यावर प्रबोधनात्मक व्याख्याने दिलेली आहेत. तसेच राज्यपातळीवरील आणि देशपातळीवरील अनेक परिषदांमध्ये सामाजिक विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण केलेले आहे. 'बहिणाबाईंच्या कविता: एक आकलन', 'यशोधरेची लेक' हा कवितासंग्रह, 'आमची आई', 'समर्थ स्त्रियांचा इतिहास' ही त्यांची विशेष गाजलेली पुस्तके आहेत.

दया पवार स्मृति पुरस्काराचे दुसरी मानकरी ठरलेले शाहू पाटोळे यांनी आठ वर्षांपूर्वी दलितांच्या खाद्य, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाबाबत 'अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे विलक्षण पुस्तक लिहिले. दोन महिन्यांपूर्वी हे पुस्तक 'दलित किचन्स इन मराठवाडा' नावाने इंग्रजीत प्रकाशित झाले. अलीकडेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शाहू पाटोळे यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता. कोल्हापूरमध्ये राहुल गांधींनी शाहू पाटोळेंसोबत दलितांच्या घरात शिजणाऱ्या अन्नासोबतच दलितांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयावर सुमारे दीड तास चर्चा केली.

शाहू पाटोळे भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी संरक्षण दलातील जनसंपर्क खात्यात (डिफेन्स पीआरओ), पीआयबी, आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या संस्थांसाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी काम केले आहे. विशेषतः नागालँडमध्ये बरीच वर्षे राहून काम केल्याने त्यांचा ईशान्य भारतावर देखील अभ्यास आहे. याच विषयावर त्यांनी 'कुकणालीम' नावाचं एक मराठी पुस्तकही लिहिले आहे.

दया पवार स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या सुकन्या शांता या मुंबईस्थित धडाडीच्या पत्रकार आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या इंग्रजी पत्रकारितेत कार्यरत आहेत. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणाऱ्या तुरुंगात होणाऱ्या जातीआधारित भेदभावावर सुकन्या शांता यांनी सखोल संशोधन करून लेखमालिका लिहिली आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर राज्यांच्या तुरुंग नियमावलीतून कैद्यांना जातीवर आधारित कामाचे वाटप करण्याची पद्धत मोडीत काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले.

दया पवार प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेल्या आत्मकथनांना ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार देण्यास सुरूवात झाली असून यंदाच्या 'बलुतं' पुरस्कारासाठी विदर्भातील ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांची निवड करण्यात आली आहे. ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अरुणा सबाने गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ’स्त्रियांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारी धाडसी कार्यकर्ती ’म्हणून मुख्यत: काम करत आहेत. स्त्रियांचे प्रश्न, लेखकांचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि असहिष्णुता यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी कृतीशील भूमिका घेतलेली आहे. अरुणा सबाने या संवेदनशील विषयावर लिहिणाऱ्या लेखिका व ध्येयवादाने भारित झालेल्या संपादक – प्रकाशिका आहेत. स्त्रीवादी जाणिवांना प्रत्यक्ष चळवळीच्या पातळीवर कामाचं परिमाण मिळवून देणाऱ्या कथा-कादंबऱ्या आणि वैचारिक लेखन-संपादन त्यांच्या नावावर आहेत.

या पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर 

प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर, मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख, मंगेश बनसोड, शरद बाविस्कर, अनिल साबळे, नितीन वैद्य, संतोष आंधळे, डॉ. गणेश देवी, जिग्नेश मेवानी आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT