मुंबई : मुंबईतील अमली पदार्थ प्रकरणात एका परदेशी आरोपीला चार वर्षांहून अधिक काळ जामीन न मिळाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला स्पष्टीकरण विचारले. यातर राज्यातील कारागृहांमध्ये वाढलेल्या कच्च्या (अंडरट्रायल) कैद्यांच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. न्यायालयीन प्रक्रियेला होणारा विलंब, जामीन अर्जांवरील निर्णयास लागणारा कालावधी आणि कारागृहांवरील वाढता ताण या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली. राज्यातील तुरुंगांत क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची गर्दी पुन्हा चर्चेत आली आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरो (एनसीआरबी) च्या ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कारागृहांमध्ये एकूण ३९,००३ कैदी असून, त्यापैकी ३१,५२३ (सुमारे ८१ टक्के) हे कच्चे कैदी आहेत. विशेष म्हणजे या कच्च्या कैद्यांपैकी १,८४५ जण पाच वर्षांहून अधिक काळ खटल्याच्या प्रतीक्षेत कारागृहातच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा आकडा अधिकच गंभीर मानला जात आहे. राज्यात कारागृहांची अधिकृत क्षमता २७,११२ असताना प्रत्यक्षात ३९,००३ कैदी असल्याने कारागृहांतील गर्दी १४३.९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे निवास, आरोग्य, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि न्यायालयीन उत्पादन यांसारख्या बाबींवर मोठा ताण निर्माण होत आहे.
सर्वाधिक गर्दीचा फटका कल्याण, ठाणे, आर्थर रोड आणि तळोजा या कारागृहांना बसत आहे. कल्याण जिल्हा कारागृहात क्षमतेच्या तब्बल ४०६ टक्के, तर ठाणे जिल्हा कारागृहात ३८१ टक्के कैदी आहेत. मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहाची क्षमता सुमारे १,०७४ असताना तेथे ३,४६१ कैदी ठेवण्यात आले आहेत. तळोजा मध्यवर्ती कारागृह, येरवडा आणि हर्सूल कारागृहांमध्येही क्षमतेपेक्षा लक्षणीय अधिक कैदी असल्याची नोंद आहे. (पूर्वार्ध)
महाराष्ट्रातील कारागृहांची स्थिती
एकूण कारागृहे : ६०
अधिकृत क्षमता : २७,११२
प्रत्यक्ष कैदी : ३९,००३
कारागृहांतील गर्दी : १४३.९%
कच्चे (अंडरट्रायल) कैदी : ३१,५२३ (८१%)
शिक्षा झालेले व इतर कैदी : ७,४८०
पाच वर्षांपासून तुरुंगात : १,८४५
असलेले कच्चे कैदी
(एसीआरबी : ३१ डिसेंबर २०२४)
सर्वाधिक गर्दीची कारागृहे
कल्याण जिल्हा कारागृह : क्षमतेच्या ४०६% कैदी
ठाणे जिल्हा कारागृह : क्षमतेच्या ३८१% कैदी
आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह (मुंबई) : क्षमता १,०७४, प्रत्यक्ष ३,४६१ कैदी
तळोजा मध्यवर्ती कारागृह : राज्यातील सर्वाधिक गर्दीच्या कारागृहांपैकी एक
येरवडा मध्यवर्ती कारागृह (पुणे) : मोठ्या प्रमाणावर कच्चे कैदी
हर्सूल मध्यवर्ती कारागृह (छत्रपती संभाजीनगर) : क्षमतेपेक्षा लक्षणीय अधिक कैदी
महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील प्रत्येक ५ पैकी ४ कैदी अंडरट्रायल (कच्चे)
१,८४५ कच्चे कैदी पाच वर्षांहून अधिक काळ खटल्याच्या प्रतीक्षेत
कारागृहांची क्षमता ओलांडून १४३.९ टक्के गर्दी
न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबामुळे कारागृहांवरील ताण वाढतोय