पवन होन्याळकर
मुंबई : राज्यात चालू 2025-26 या शैक्षणिक वर्षात राज्यात तब्बल 7 हजार 742 शाळांमध्ये केवळ 1 ते 10 इतकीच पटसंख्या नोंदवली गेली आहे. तर 52 हजार 702 शाळा 11 ते 100 पटसंख्येवर तग धरून आहेत. रत्नागिरी, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अल्प पटसंख्येच्या शाळांची संख्या जास्त असून, काही जिल्ह्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत एकूण पटसंख्येत थेट घट नोंदली गेली आहे.
एकीकडे शहरालगतच्या जिल्ह्यांत विद्यार्थ्यांची वाढ, तर दुसरीकडे ग्रामीण भाग, कोकण-विदर्भात शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. युडायस प्लसमध्ये यंदा झालेल्या विद्यार्थी डेटा एंट्रीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. राज्यात एकूण 1 लाख 8 हजार 90 शाळा असून त्यामध्ये 2 कोटी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी पहिली ते बारावीचे शिक्षण घेत आहेत. यामध्ये काही शहरी भागात मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत तर काही हजारो शाळा विद्यार्थी नसल्याने केवळ नावापुरत्या सुरू असून, प्रत्यक्षात त्या शाळांमध्ये मोजकीच मुले शिक्षण घेत आहेत.
युडायसच्या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 903 शाळांमध्ये केवळ 1 ते 10 इतकीच पटसंख्या असून, सातारा जिल्ह्यात अशा 730, रायगडमध्ये 672, पुण्यात 605 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 571 शाळा कमी पटसंख्येवर सुरू आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये 11 ते 100 पटसंख्या असलेल्या शाळांची मोठी संख्या आहे. तर 47,644 शाळांमध्ये 100 पेक्षा जास्त पटसंख्या आहे. शहरीभागात आकडा वाढलेला दिसत असला, तरी ग्रामीण भागातील हजारो शाळा कमी पटसंख्येवर सुरू असल्याचे वास्तव आहे.
* 2024-25 या शैक्षणिक वर्षात राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या 2 कोटी 11 लाख 73,938 इतकी होती.
* 2025-26 मध्ये ही संख्या वाढून 2 कोटी 15 लाख 37,450 वर पोहोचली आहे.
* त्यामुळे राज्यभरात 3 लाख 63 हजार 512 विद्यार्थ्यांची निव्वळ वाढ नोंदवली गेली आहे.
* जिल्हानिहाय वाढीमध्ये पुणे जिल्हा अव्वल असून, येथे 63,977 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
* ठाणे जिल्ह्यात 48,135, छत्रपती संभाजीनगर 33,070, नागपूर 24,424, नाशिक 23,955, तर पालघर जिल्ह्यात 22,440 विद्यार्थ्यांची वाढ.
* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 2,803 विद्यार्थ्यांची घट झाली आहे.
* त्याखालोखाल सातारा (2,645), भंडारा (1,651), रत्नागिरी (876) आणि गोंदिया (354) जिल्ह्यांत विद्यार्थी संख्या घटली आहे.
* राज्यात एकूण विद्यार्थी संख्येत वाढ दिसत असली, तरी हजारो शाळांमध्ये पटसंख्या घटण्यामागे जिल्ह्यांमध्ये स्थलांतर हा सर्वात मोठा घटक ठरत आहे.
* इंग्रजी माध्यम, सुविधा, शिस्त आणि गुणवत्तेचा भास या कारणांमुळे पालकांचा कल सरकारी शाळांऐवजी खासगी शाळांकडे वाढत आहे.
* शिक्षकांची कमतरता, अस्थिर नियुक्त्या, अनेक शाळांमध्ये वर्षानुवर्षे एकच शिक्षक, बहुवर्गीय अध्यापन, बदली-विलंब आणि रिक्त पदे, अशैक्षणिक कामे
* शाळा विलीनीकरण आणि बंदीची भीती हा घटकही पालकांच्या निर्णयावर परिणाम करत आहे.
* ‘शाळा कधीही बंद होऊ शकते’ या भीतीपोटी पालक सुरुवातीलाच मुलांना दुसर्या शाळेत दाखल करत असल्याचे अनेक भागांत दिसून येते.
* ग्रामीण आणि डोंगराळ भागांत वाहतूक सुविधांचा अभाव, अंतर, रस्त्यांची खराब अवस्था आणि पावसाळ्यातील अडचणी यामुळे नियमित शाळा उपस्थिती राखणे कठीण होत आहे.