मुंबई : मुंबई, ठाणेसारख्या मोठ्या शहरांत गणेशोत्सवाचा मोठा थाटमाट असला, तरी गावच्या मूळ घरी येणार्या गणरायाचे चाकरमान्यांना वेध लागले आहेत. चार दिवसांवर आलेल्या गणपतीच्या स्वागताला गाव गाठण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरू आहे. सामानाची बांधाबांध सुरू आहे. त्यातच यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा तब्बल 11 ते 12 लाख चाकरमानी मुंबईतून कोकणात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येत्या शनिवारी, 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे किमान एक-दोन दिवस आधी गावी पोहोचून तयारी करण्याचे नियोजन मुंबई-ठाण्यातील कोकणवासीयांनी केले आहे. त्यानुसार चाकरमान्यांनी मंगळवारपासून कोकणची वाट धरली आहे. कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रेल्वेसह एस.टी. महामंडळ, खासगी ट्रॅव्हल्स सज्ज झाले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मध्य-पश्चिम-कोकण रेल्वेने तब्बल 342 गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आहेत. या गाड्यांनी तब्बल साडेचार लाख चाकरमानी कोकणात जाणार आहेत. गेल्यावर्षी 312 गणपती स्पेशल गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्यातून साडेतीन लाख चाकरमान्यांनी कोकण गाठले होते.
रेल्वेप्रमाणेच यंदा एस.टी. महामंडळानेदेखील गणपती स्पेशल गाड्यांची संख्या वाढविली आहे. गेल्यावर्षी 4 हजार 300 गणपती स्पेशल गाड्यांनी दोन लाख चाकरमानी कोकणात गेले होते. यंदा तब्बल पाच हजार एस.टी. बसेसमधून अडीच लाख कोकणावासीय प्रवास करणार आहेत.
रेल्वे, एस.टी.चे तिकीट ज्या चाकरमान्यांना मिळाले नाही, त्यांनी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी सुमारे 1,500 ट्रॅव्हल्स मुंबईतून गणेशोत्सवाआधी दोन दिवस निघाल्या होत्या. यंदा ट्रॅव्हल्सच्या संख्येत 500 ने वाढ झाली आहे. यंदा मुंबईतून 2 हजार ट्रॅव्हल्स कोकणाकरिता गुरुवारपासून जादा वाहतूक करणार आहेत. या ट्रॅव्हल्समधून सुमारे सव्वा ते दीड लाख चाकरमानी कोकणातल्या आपल्या घरी जाणार आहेत. तसेच भाडेतत्त्वावर गाड्या घेऊन जाणारे चाकरमानीदेखील आहेत. याशिवाय स्वत:च्या मालकीच्या चारचाकी घेऊन कोकणात जाणार्यांची संख्यादेखील मोठी आहे. यंदा 5 ते 6 हजार चारचाकी कोकणात येतील, अशी माहिती कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली. एकंदरच, यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात 11 ते 12 लाख चाकरमानी दाखल होतील, असा विश्वासदेखील चव्हाण यांनी व्यक्त केला.