मुंबई : पुढारी वृत्तसेवा – यंदाच्या वर्षापासून 17 नंबरचे अर्ज प्रत्येक शाळेत भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्या प्रमाणे आता आऊट ऑफ टर्न देखील प्रत्येक शाळेत होणार आहे. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत चांगला निर्णय असून या निर्णयाचे मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने मनापासून स्वागत केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात प्रॅक्टिकल परीक्षा झालेली नसेल तर अशी महाविद्यालये लेखी परीक्षेनंतर प्रॅक्टिकल परीक्षा घेऊन शकतात. याला आऊट ऑफ टर्न पद्धत असे म्हणतात. यंदा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेपासून सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन पध्दतीने प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा मूल्यमापनाचे गुण लॉगीन मधून भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. आता ही प्रक्रिया पूर्वीसारखी केंद्रनिहाय उपलब्ध करून दिली जाणार नाही. यामुळे फेब्रुवारी-मार्च 2024 च्या 'आउट ऑफ टर्न'ने आयोजित करावयाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच आयोजित करण्यात येणार आहेत. पूर्वी प्रात्यक्षिक अथवा तोंडी परीक्षला गैरहजर राहिल्यास लेखी परीक्षा संपल्यानंतर मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरावर एकच केंद्र दिले जात असे तिथे विद्यार्थी परीक्षा देत आता हे पूर्णतः बंद होणार आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया शाळेत करता येणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक महामंडळाकडून व्यक्त करण्यात आली.