मुंबई : राज्यात पुढील 24 तासांत रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली असून दरड हटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा दिला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात शनिवारी दिवसभर आणि रविवारी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 19.8 मिमी पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 16.3 मिमी, चंद्रपूर 12.3 मिमी, ठाणे जिल्ह्यात 11.1 मिमी आणि रायगड जिल्ह्यात 9.4 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.