मुंबई : कला शिक्षणाचा पाया मानल्या जाणार्या जीडी आर्ट पदविका अभ्यासक्रमासाठी वर्षानुवर्षे बंधनकारक असलेली ‘कला फाऊंडेशन’ ही पायरी आता हद्दपार झाली असून, थेट दहावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ‘आम्ही वर्ष फुकट घालवलं का?’ असा संतप्त सवाल राज्यभरातून ‘फाऊंडेशन’ केलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार जीडी आर्ट हा चार वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आता तीन वर्षांचा करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी याआधी एक फाऊंडेशन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट होती. या अभ्यासक्रमानंतर जीडी आर्टच्या थेट दुसर्या वर्षाला प्रवेश घेऊन हे विद्यार्थी पुढील तीन वर्षे पदविका करत होते. हे चार वर्षे घालवण्यापेक्षा आता तीन वर्षांची पदविका करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
फाऊंडेशन अभ्यासक्रम कालबाह्य ठरवण्यामागे अनुदान वाचवण्याचा डाव आहे. जर विद्यार्थी फाऊंडेशनला प्रवेश घेत नसतील, तर संस्थांना देण्यात येणारे अनुदान आपोआप बंद करता येईल, असा सरकारचा डाव आहे. अशा तक्रारी संस्थाकडून केल्या जात आहेत.
याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, अंगी कलागुण असलेल्या सर्वांनाच फाऊंडेशन अभ्यासक्रम करणे शक्य होत नाही. पण म्हणून ते कला शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हा या निर्णयामागचा हेतू आहे. तसेच फाऊंडेशन करूनही विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.
कला पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यापूर्वी इयत्ता दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत होता. त्यानंतर चार वर्ष पदविका अभ्यासक्रम असायचा. मात्र नव्या बदलानुसार आता इयत्ता दहावीनंतर थेट पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहे. फाऊंडेशन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आवश्यकता नसेल. उपयोजित कला पदविका, रेखा व रंगकला पदविका, शिल्पकला व प्रतिमानबंध पदविका, कला व हस्तकला - गृहसजावट पदविका, कला व हस्तकला वस्त्रकाम पदविका - प्रिटिंग अॅण्ड ड्रॉईंग, कला व हस्तकला वस्त्रकाम पदविका - व्हिव्हिंग, कला व हस्तकला मातकाम पदविका, कला व हस्तकला धातुकाम पदविका या अभ्यासक्रमांना आता इयत्ता दहावीनंतर थेट प्रवेश मिळणार आहे. तसेच हे सर्व अभ्यासक्रम आता चारऐवजी तीन वर्षांचे असणार आहेत.
वर्षभर अभ्यास करून आम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण केला. आम्हाला अपेक्षा होती की, आम्हाला जीडी-आर्टच्या थेट दुसर्या वर्षात प्रवेश मिळेल, पण तसे काहीच झाले नाही. त्याऐवजी आता कोणताही अभ्यासक्रम न केलेल्या आणि फक्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळणार असेल, तर मग या मूलभूत अभ्यासक्रमासाठी वेळ, पैसा खर्च केला त्याचे काय, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.