पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, परंतु पक्ष आणि विचारधारेसाठी मी हा प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. शनिवारी नागपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी ही ऑफर देणाऱ्या विरोधी नेत्याची ओळघ उघड केली नसली तरी, इंडिया आघाडीने नेहमीच गडकरी यांची प्रशंसा केली होती.
मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, पण एक व्यक्ती मला म्हणाली, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मात्र पंतप्रधान बनणे हे माझे आयुष्यातील उद्दिष्ट नाही. मी विरोधी पक्षातील त्या नेत्याला विचारले, तुम्ही मला पाठिंबा का द्यावा आणि मी तुमचा पाठिंबा का स्वीकारू? एखाद्या व्यक्तीचा विश्वास हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.