मुंबई

Opinion poll : राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर काय आहे, तज्ज्ञांचं मत ? ‘आधी सरकारची शक्‍तिपरीक्षा घ्या’

मोनिका क्षीरसागर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : स्वतंत्र गट स्थापन करणे, त्याला मान्यता मिळवणे, त्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांच्या अखत्यारीतील लढाई लढत बसणे यात वेळ घालवण्यापेक्षा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याचे सिद्ध करणे.

संसदीय कामकाजाचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांनी शिंदे गटाने काय केले म्हणजे हाराजकीय तिढा लवकर सुटेल आणि नव्या सरकारची स्थापना होईल याची प्रक्रियाच एका चर्चेमध्ये स्पष्ट केली. ती अशी आहे…शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे 37 आमदार झाले असून या आमदारांच्या सहीचे पत्र राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना शुक्रवारी दिले जाणार आहे, अशी माहिती शिंदे गटाच्या आमदारांनी गुरुवारी दिली.

नवा गट स्थापन करून भाजपबरोबर शिंदे गट जाणार आहे; तर शिवसेनेकडे 17 आमदार राहणार आहेत. शिवसेना म्हणून गट स्थापन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांचे पत्र लागत असल्याने शिंदे गटाने विधानसभेत वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी किणीकर यांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला. मात्र केवळ वेगळा गट स्थापन करण्याच्या या हालचाली होणार असतील तर त्या कायद्याच्या गुंतागुंतीत सापडू शकतात. उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या, अशी मागणी या शिंदे गटाने केल्यास सध्या सुरू असलेला राजकीय पट पूर्णपणे उधळला जाईल आणि नवी मांडणी करण्याचा मार्ग सुकर होईल, असे तज्ज्ञांना वाटते.

सरकारही जाईल अन् उपाध्यक्षही

1 शिंदे गटाने सर्वप्रथम राज्यपालांची भेट घ्यावी. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कसे अल्पमतात आले आहे
हे त्यांच्या लक्षात आणून द्यावे. त्यासाठीचे निवेदन आपल्या समर्थक आमदारांच्या सहीसह त्यांना द्यावे. त्याची
नक्‍कीच दखल घेतली जाईल.

2 त्यानंतर पुढची कारवाई राज्यपाल स्वत:च करतील. शिंदे यांच्या निवेदनाची दखल घेत राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक दोन किंवा आठवड्याची मुदत देत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगतील.

3 शिवसेनेचे तब्बल 37 आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. याशिवाय 9 अपक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. हे संख्याबळ पाहता ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही. अल्पमत सिद्ध होऊन हे सरकार कोसळले की या सरकारने नियुक्‍त केलेला विधानसभेचा उपाध्यक्षदेखील घरी जाईल.

4 नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर ओघानेच बहुमतातील सरकारचाच विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसेल आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळण्याचा मार्गही राजमान्य होईल.

SCROLL FOR NEXT