Operation Tiger 2 File Photo
मुंबई

Operation Tiger 2: उबाठाचे २२ नगरसेवक शिंदेंच्या गळाला? मुंबई पालिकेतही ऑपरेशन टायगर -२ च्‍या हालचाली

वेगळा गट तयार करण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: उबाठाचे सहा खासदार गळाला लावल्‍यानंतर शिवसेना शिंदे गटाने मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर २ राबविण्याच्‍या हालचाली सुरू केल्‍या आहेत. पहिल्या टप्प्यात उबाठाचे २२ नगरसेवक गळ्याला लागण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तशी चर्चा महापालिका मुख्यालयात दबक्या आवाजात सुरू आहे. परंतु दोन तृतियांश संख्याबळाच्‍या नियमामुळे प्रवेशाचे घोडे अडल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महानगरपालिकेत उबाठाचे ६५ नगरसेवक आहेत. यापैकी २२ नगरसेवक स्वतंत्र गट तयार करून शिंदे गटात येण्यास उत्‍सुक आहेत. मात्र दोन तृतियांश संख्याबळ अर्थात ४३ नगरसेवकांचा आकडा पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहेत, अशी माहिती शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

शिंदे गटातील एका नगरसेवकाने दिलेल्या माहितीनुसार, उबाठातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेली कुरघोडी, अंतर्गत धूसफूस, पक्ष नेतृत्वावर आणि विरोधी पक्षनेत्यावर असलेल्या नाराजीमुळे उबाठा पक्षातील २२ नगरसेवक शिंदे गटात येण्यास तयार आहेत. वेळप्रसंगी ४३ नगरसेवकांचा गट स्थापन करण्यास संख्याबळ कमी पडले, तर त्यांच्याकडून वेगळा गट तयार करून प्रवेश होऊ शकतो, असे प्रयत्‍न वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत.

विरोधकांची संख्या १०५

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपा, शिंदे गट आणि पाठिंबा दिलेला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष मिळून १२२ नगरसेवक आहेत. मात्र उबाठा, मनसे आणि एमआयएम पक्ष मिळून विरोधी पक्षांचे १०५ नगरसेवक आहेत. यामुळे पालिकेतील प्रस्ताव मंजूर करण्यास सत्ताधारी पक्षाला अवघड जाते.

अशाप्रकारे प्रक्रिया होऊ शकते

उबाठा पक्षातील ४३ नगरसेवक अर्थात दोन तृतियांश संख्याबळ पूर्ण केल्यास ते कोकण भवन येथे वेगळा गट नोंदणीसाठी अर्ज करू शकतात आणि नेता निवडून नोंदणी करू शकतात. यामुळे त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार नाही. परंतु फक्त २२ नगरसेवकांनी कोकण भवन येथे अर्ज देवून गट नोंदणी केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजपा : ८९

शिंदे गट : २९

उबाठा : ६५

राष्ट्रवादी : ४

काॅंग्रेस : २४

एमआयएम : ८

मनसे : ६

समाजवादी : २

उबाठातील २२ नगरसेवकांशी बोलणी सुरू आहेत. नाराजी, गटबाजी, पक्षश्रेष्ठींकडून वेळ न देणे, कामे न होणे अशा विविध कारणाने ते त्रासले आहेत. नाराजीची संख्या वाढत चालल्यामुळे ऑपरेशन टायगर २ मुंबई महापालिकेतही होणार आहे.
- किरण लांडगे, नगरसेवक, शिंदे गट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT