मुंबई : खेतवाडी मेन रोड येथील अकरावी गल्लीच्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास एका स्कूल बसच्या धडकेत 1 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची आजी जबर जखमी झाली. याप्रकरणी बसचालक संभाजी वखारे यास चौकशीसाठी डी बी मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपूर्ण खेतवाडी परिसरात शोककळा पसरली होती.
मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास जी डी सोमानी हायस्कूलची एक बस खेतवाडी मेन रोड येथून ग्रँड रोडच्या दिशेने जात होती. यथील अकरावी गल्लीच्या नाक्यावर विद्यार्थ्यांना बसमधून उतरवण्यासाठी बसने काही काळ थांबा घेतला होता. त्यानंतर सदर स्कूल बस चालकाने पुन्हा बस सुरू करून ग्रँड रोडच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता त्याची धडक बससमोरून दोन मुलांना सोबत घेऊन जाणाऱ्या चंद्रकला व्यास (68) या महिलेला बसली.
अचानक धडक बसल्याने सदर महिला बसखाली आली. त्यावेळेस तिच्या कडेवर असलेला 1 वर्षांचा अबीर केवल व्यास, हा बालक बसच्या चाकाखाली खाली येऊन चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिमुकली थोडक्यात बचावली
त्याच बसमधून नुकतीच उतरून आपल्या आजीचा हात धरून बस मधून खाली उतरलेली त्याची चुलत बहीण समायरा व्यास ही आजीचा हात सोडून चलाखीने पुढे सरसावली आणि या अपघातातून थोडक्यात बचावली. चंद्रकला व्यास यांना जवळच्या रिलायन्स रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले असून त्यांचा एक हात बसच्या चाकाखाली आल्याने त्या जबर जखमी झाल्या.