मुंबई : राज्यातील बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत एकूण 15 हजार 483 अर्ज प्राप्त झाले असून राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये 90 आणि खासगी महाविद्यालयांमध्ये 5 हजार 972 अशी एकूण 6 हजारहून अधिक जागा शिल्लक आहेत. यापूर्वी तीन फेरीत 9 हजार 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
चौथ्या फेरीसाठी 9 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पसंतीक्रम भरावा लागणार आहे. या पसंतीक्रमानुसार महाविद्यालय निवड यादी 11 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. 12 ते 16 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांसह प्रवेश घ्यावा लागणार आहे. हे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून संस्थात्मक स्तर फेरी सुरू होईल.
17 तारखेला संस्थात्मक स्तरावरील पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल. इच्छुक विद्यार्थी 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष कॉलेजमध्ये अर्ज करु शकतील. 20 ऑक्टोबर रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी, कोट्यानिहाय गुणवत्ता यादी, जाहीर केल्यानंतर त्यानुसार विद्यार्थ्यांना 24 ते 26 ऑक्टोबरपर्यंत मूळ कागदपत्रांसह प्रवेश घेता येईल. यानंतर निवड यादी-2 ची प्रक्रिया 26 ते 29 ऑक्टोबरपर्यंत आणि उर्वरित जागांसाठी प्रवेश 30 ऑक्टोबरपासून सुरू होईल. अंतिम प्रवेशाची नोंद 31 ऑक्टोबरला पूर्ण होणार आहे. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान दिवाळी सणानिमित्त प्रवेश प्रक्रिया होणार नाही.