मुंबई : देशातील सर्व विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या (सीयूटीई) पीजी २०२५ परीक्षेचे राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीकडून (एनटीए) वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ही परीक्षा १३ मार्च ते १ एप्रिल या काळात होणार आहे. १५७विषयांसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा तीन सत्रांमध्ये होणार आहे.
पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी ९ ते १०. ३० वाजेपर्यंत, दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी १२. ३० ते २ वाजेपर्यंत आणि तिसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी ४ ते ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. क्युट परीक्षेसाठीच्या शहराची माहिती ही एनटीएच्या https://nta.ac.in आणि https://exams.nta.ac.in/CU ET-PG/ या संकेतस्थळावर परी-क्षेच्या १० दिवस अगोदर कळविण्यात येणार आहे. तसेच परीक्षेसाठी प्रवेशपत्र चार दिवस अगोदर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थी परीक्षा शहराची माहिती घेऊन प्रवासाची आगाऊ तयारी करू शकणार आहेत.
परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र, वाहनचालक परवाना यापैकी कोणतेही एक वैध मूळ ओळखपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जावे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असेही एनटीएकडून जाहीर करण्यात आले आहे.
देशातील अनेक केंद्रीय व राज्य विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ व खासगी विद्यापीठांमध्ये एमएससी, एमए, एमकॉम, एमबीए, एमटेक, एमएफए यासारख्या अनेक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूटीई पीजी परीक्षा एनटीएतर्फे घेतली जाते. १५७ विषयांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी २ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर या परीक्षेसाठी देशभरातून ४ लाख १२ हजार २४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.