जोगेश्वरी : पुढारी वार्ताहर
विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील ९० वर्षे जुने जैन चैतालय या मंदिरावर महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई केली. यामुळे जैन धर्मीय व्यथित झाले आहेत. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी अहिंसक रॅली विलेपार्ले पूर्व ते महापालिका के. पूर्व विभाग कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.
या रॅलीत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार पराग अळवणी निषेध रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीत मुंबईतील संपूर्ण जैन आणि हिंदू समाज हिंदू विश्व परिषदेचे सदस्य, जैन समाजाचे सर्व विश्वस्त, मंडळे, संस्था सहभागी होणार आहेत. मंदिर पाडण्याच्या संदर्भात महापालिकेने नोटीस दिली होती. या विरोधात येथील जैन बांधवांनी शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ८ एप्रिल रोजी याचिका फेटाळून लावली होती. मात्र मंदिर पाडण्यास परवानगी देण्यास तोंडी स्थगिती दिल्याचे जैन धर्मियांचे म्हणणे आहे. असे असताना महापालिकेने बुधवारी केलेल्या कारवाईमुळे संताप व्यक्त होत आहे. विरोध असतानाही महानगरपालिका 'के' पूर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांनी कोणताही विचार न करता आदेश काढल्याचा आरोपही जैन धर्मियांनी केला आहे. जैन धर्मियांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घाडगे यांच्यावर निलंबनाची कारवाईची करावी, जैन मंदिर पुन्हा बांधून देण्यात यावे, अशी मागणी जैन धर्मियांकडून केली आहे.