मुंबई : स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर मोठ्या सामाजिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन होत असते. मात्र, यामुळे अनेकदा रक्ताचा प्रचंड मोठा साठा निर्माण होऊन त्याचा अपव्यय होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रक्तसंकलन काळजीपूर्वक नियोजन करूनच करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सर्व रक्तपेढ्यांना करण्यात आले आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत रक्तपेढ्यांकडे साधारणतः तीन महिन्यांची साठा तयार असण्याची आवश्यकता असते. त्यापेक्षा अधिक संकलन झाल्यास कालबाह्य होऊन रक्त नष्ट होण्याची शक्यता असल्याने, आवश्यकतेपलीकडे संकलन करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच, रक्तदान शिबिरांचे नियोजन करताना रक्तसाठा कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
राजकीय दबाव आणि तांत्रिक सुविधांचा अभाव
काही राजकीय पक्षांकडून रक्तपेढ्यांवर शिबिरांद्वारे अतिरेक संकलनाचा दबाव आणला जातो, अशी तक्रार रक्तपेढ्यांकडून वारंवार केली जाते. या पार्श्वभूमीवर अशा पक्षांनी रक्तसंकलन व साठा व्यवस्थापनाची वास्तव परिस्थिती समजून घ्यावी, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत.
शासकीय व महापालिकेच्या काही रुग्णालयांत रक्तघटक विभाजनाची सुविधा नसल्याने संपूर्ण रक्ताचा अपव्यय होतो. कांदिवली शताब्दी, वांद्रे भाभा, व्ही.एन. देसाई, जी.टी., कामा यांसारख्या रक्तपेढ्यांत ही समस्या प्रकर्षाने दिसते. काही रक्तपेढ्यांकडे पुरेसा कर्मचारीवर्ग असूनही, कर्मचार्यांच्या हट्टामुळे केवळ एकाच पाळीत काम केले जाते. परिणामी, प्रसूतीसारख्या तातडीच्या प्रसंगी रक्तपेढी बंद असल्यामुळे बाहेरील साठ्यावर अवलंबून राहावे लागते. ‘रात्री उशिरा प्रसूती झाल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांनी काय करावे?’ असा प्रश्न रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपस्थित होत आहे.