मुंबई

NMMC Recruitment Exam : नवी मुंबई पालिका भरती परीक्षा नियोजित वेळेतच होणार; महासभेचा स्थगितीचा ठराव शासनाकडून निलंबित

ऑनलाइन स्पर्धा परीक्षा २१ व २२ जुलै रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळेनुसार होणार

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : आज झालेल्या महासभेत उद्या होणाऱ्या परीक्षेसह संबंधित भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने हा ठराव निलंबित केला असून नियोजित वेळेनुसार सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त (प्रशासन) यांनी दिली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळसेवा भरतीअंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-कमधील २० संवर्गांतील १३२ पदांसाठी एकूण १९,२२० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सहा संवर्गांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाइन स्पर्धा परीक्षा २१ व २२ जुलै रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे उपायुक्त (प्रशासन) यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवार (२१ जुलै) आणि बुधवार (२२ जुलै) रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसह संपूर्ण भरती प्रक्रियेलाच आज झालेल्या महासभेत स्थगिती देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. हा निर्णय केवळ नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे सभागृह नेते सागर नाईक यांनी स्पष्ट केले. तसेच परीक्षार्थींना परीक्षा स्थगित झाल्याची माहिती तातडीने देण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी प्रशासनाला दिले होते.

मात्र, महासभेतील हा निर्णय रात्री सुमारे १० वाजता शासनाकडून निलंबित करण्यात आला. त्यामुळे नियोजित वेळेनुसार सर्व परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विशेष लक्ष दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन ते तीन अधिकाऱ्यांची केंद्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात १,११२, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २,५३५, मुंबई जिल्ह्यात ८,१२३, नागपूर जिल्ह्यात ९४८, नाशिक जिल्ह्यात १,७८३ आणि पुणे जिल्ह्यात ४,४२९ अशा एकूण १८,९३० उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला आहे.

ही परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS iON) यांच्या माध्यमातून घेतली जात असून, नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष दिले आहे. पात्र उमेदवारांना १० जुलैपासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा होत आहे, तेथील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत पत्रे पाठविण्यात आली आहेत. तसेच परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्यासाठी आवश्यक परवानगीही घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT