मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून (एनएमसी) राबविण्यात आलेल्या तपासणीमध्ये राज्यातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांच्या वार्षिक नूतनीकरणाबाबतच्या निकषांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये नव्याने मान्यता मिळालेल्या 10 महाविद्यालयांसह मुंबई महानगरपालिकेच्या आणि पुण्यातील सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. याप्रकरणी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डीएमईआरचे संचालक यांनाच थेट उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एमएसएमईआर नियमन 2023 नुसार वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांचे वार्षिक नूतनीकरण करण्याची प्रक्रिया एनएमसीच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने राबविण्यात येते. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेले स्व-घोषणापत्र, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीमधील प्राध्यापकांच्या उपस्थितीचा डेटा, वैद्यकीय मापदंड आणि पायाभूत सुविधा यांची तपासणी करण्यात आली.
या मूल्यांकनानंतर राज्यातील तब्बल 30 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांचा तुटवडा, वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली. नोटीसीवर वैद्यकीय महाविद्यालयांनी सादर केलेल्या अहवालातील उत्तरे असमाधानकारक असल्याचे आढळून आले. यातील त्रुटी दूर करण्यासाठी संस्थांकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
या महाविद्यालयांमधील सुविधांबाबत मूल्यांकनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्याने अखेर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डीएमईआरचे संचालक यांनाच उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी मुंबई, अंबरनाथ, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली, जालना, बुलढाणा आणि भंडारा या नऊ संस्थांसह सोलापूरमधील डॉ. वैशंपायन मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, रत्नागिरी, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, सातारा, अलिबाग, जळगाव, मिरज, नंदुरबार, परभणी, सिंधुदुर्ग, नागपूरमधील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळमधील श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरमधील राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील आर्मड् फोर्स वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई महानगरपालिकेचे शीव रुग्णालय यांचा समावेश आहे.