Pudhari Mahaicon 2026 Pudhari
मुंबई

Pudhari Maha Icon 2026: इंधन परावलंबित्व संपविता येईल : नितीन गडकरी

Anil Kakodkar Maha Icon Award: देशाला इंधन निर्यातदार बनविण्याचे स्वप्न साकार करू

पुढारी वृत्तसेवा

Pudhari Maha Icon 2026

मुंबई : आज देशाला २२ लाख कोटींचे इंधन आयात करावे लागते. पण बायोइंधनापासून हवाई इंधनापर्यंत पर्यायी इंधन तयार करण्याची मोठी संधी देशाला आहे. उसाची मळी, मका, तांदूळ आणि अन्य धान्यांपासून हे पर्यायी इंधन तयार कारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो दिवस आता दूर नाही की, भारत बायोइंधन निर्यात करणारा देश ठरेल आणि देशाचे इंधन परावलंबित्व पूर्णपणे संपेल, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते विकास तथा परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘महा आयकॉन २०२६’ पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, सचिनदादा धर्माधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, देशात आता इथेनॉलचा वापर सुरू झाला आहे. इलेक्ट्रिक कारचे उत्पादन आणि मागणी वाढत आहे. आजच मी पेट्रोल आणि इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकली बाजारात आणल्या आहेत. काही दिवसांत ट्रॅक्टरदेखील इथेनॉलवर येईल. तो दिवस दूर नाही की, विमानेदेखील बायोइंधनावर उड्डाण करतील. शेतमालापासून पर्यायी इंधन तयार करण्यास मोठा वाव आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखाने आहेत. उसाची मळी तसेच मका, तांदूळ आणि अन्य शेतमालापासून आपल्याला बायोइंधन तयार करता येऊ शकते. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांना लाभ होईल. देशाचे इंधनावरचे परावलंबित्व पूर्णपणे संपविण्याची संधी बायोइंधनाच्या माध्यमातून आपल्याला आहे. आपला देश बायोइंधन तयार करून आखाती देशांची जागा घेऊ शकतो. त्यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल, फुकट काही मिळणार नाही. आपण राज्यात टोल रस्त्यांची सुरुवात केली होती. आज देशभर रस्ते बनविताना आता त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जात आहे. चूक आढळली तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई होत आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांत देशातील रस्ते जागतिक दर्जापेक्षा चांगले होतील, असे सांगत देशात पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या प्रगतीचा आढावा दिला.

‘पुढारी’ने जनजागृती करावी

बायोइंधनामुळे शेतीची आणि ग्रामीण भागाची प्रगती होणार आहे. याबाबत ‘पुढारी’ने जनजागृती करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. त्याचा सर्वाधिक फायदा हा कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच मराठवाड्याला होणार आहे, असेही गडकरी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT