वर्सोवा : "सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत सक्षम असून, ते पुढील १०० वर्षे मुख्यमंत्री राहावेत, अशी आमची इच्छा आहे," अशा शब्दांत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.
त्याचबरोबर, पूर्वीच्या सरकारप्रमाणे अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाईसाठी हात आखडता घेतला जाणार नाही, तर युती सरकार शेतकऱ्यांच्या धर्तीवर मच्छीमारांनाही १०० टक्के नुकसान भरपाई देण्याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन त्यांनी दिले.
मंत्री नितेश राणे यांनी रविवारी (दि.२२) वर्सोवा येथील मच्छीमार प्रशिक्षण केंद्र, बर्फ कारखाना आणि वर्सोवा खाडीला भेट देऊन मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मतदार संघात जाण्याऐवजी गुजरात दौरा अर्धवट सोडून थेट मच्छीमारांच्या समस्या ऐकण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्या कामाची भूमिका स्पष्ट करताना राणे म्हणाले, "मी विकत घेतला जाणारा मंत्री नाही आणि कोणाच्या चेकबुकमध्ये मला विकत घेण्याची ताकद नाही. मी केवळ ऐकणारा नाही, तर १०० टक्के काम करणारा आहे. नुकसानग्रस्त मच्छीमारांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि मी तुम्हाला तसा शब्द देतो." त्यांच्या या आश्वासनामुळे स्थानिक मच्छीमारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावेळी पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, विविध राजकीय विषयांवर आपली रोखठोक मते मांडत विरोधकांवर, विशेषतः संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबीयांवर, जोरदार टीका केली.
‘हिंदू गब्बर’ची दखल मातोश्रीने घेतली
कार्यकर्ते ‘हिंदू गब्बर’ म्हणून उत्साहाने बॅनर लावत असल्याचे सांगत, "या हिंदू गब्बरची आता मातोश्रीने दखल घेतली आहे. ‘ये डर जरुरी है’," अशाशब्दांत त्यांनी मातोश्रीला डिवचले. "कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्यामुळे त्यांनी मातोश्री परिसरात बॅनर लावले असतील. नशीब, त्यांनी मातोश्रीच्या बाथरूममध्ये लावले नाहीत," असा टोलाही त्यांनी लगावला. काही लोकांची रात्रीची उतरत नाही, त्यामुळे ते सकाळी उठून बॅनर लावतात, अशी टीकाही त्यांनी केली.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "शेतकरी आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. स्वतःच्या मुलीला वाईनची फॅक्टरी उघडून देण्यासाठी लागणाऱ्या द्राक्षापुरताच त्यांचा संबंध आहे. भांडुपच्या देवानंदने गल्लीत बसून एवढे मोठे विषय हाताळू नयेत". पुढे त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हिंदू धर्मावर द्वेष असल्याचा आरोप करत, त्यांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असे सुनावले. "आज हिंदू म्हणून एकत्र राहणे गरजेचे आहे. आपण आपापसात भांडत राहिलो, तर उद्या घराबाहेर भोंगे लागतील आणि घरातील पूजाही बंद होतील," अशी भीती मंत्री नितेश राणे व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आदर्श काम करत असून पुढची २५, ५०, १०० वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून, ते दोन्ही कुटुंबांना (ठाकरे-पवार) चांगले ओळखत असल्याने अनुभवाने बोलले असतील, असेही मत त्यांनी मांडले.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य दिलजमाईवर बोलताना नितेश राणे म्हणाले, "मला माझ्या मच्छीमार आणि कोळी बांधवांची चिंता आहे. पण कोणाच्या घरातली भांडणे मिटून जर ते एकत्र येणार असतील, तर त्यात समाधानच आहे."
राज्यात कुठेही हिंदी सक्ती केलेली नाही, असे स्पष्ट करत ते म्हणाले, "आम्हीही सरकारमध्ये आहोत. राज्यात मराठी सक्तीची आहे. हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या. आम्हीही मराठी आणि हिंदू आहोत. हिंदू समाजाला तोडण्यासाठी हे कार्यक्रम हाती घेऊ नका. हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या कार्यक्रमाला बळी पडू नका," असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले आहे.