महेश पांचाळ
मुंबई: गेल्या १४ जुलै रोजी फरार आरोपी धर्मेंद्रसिंग चौधरी उर्फ धर्मेश याचीही विशेष न्यायालयाने निर्दोष सुटका केली आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका नीता नाईक यांच्या हत्येचे गूढ २६ वर्षांनंतरही कायम राहिले. एकेकाळचा गँगस्टर अश्विन नाईक याच्यासह सर्वच्या सर्व आरोपी ओळीने निर्दोष ठरले, पण नीता नाईकला गोळ्या घातल्या कुणी, या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही.
कदाचित आता ते कधीही मिळणार नाही. कोणत्याही खून खटल्यात आरोपी निर्दोष सुटला तर खटला संपतो. खुनी कोण याचा शोध घ्या, असे फर्मान सोडण्याची पद्धतच आपल्या न्यायव्यवस्थेत नाही.
त्यामुळे चौदा आरोपी निर्दोष ठरवतांना दोषी कोण आहे याचा छडा लावा असे कोणतेही आदेश विशेष न्यायालयानेही दिले नाहीत. परिणामी मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात सर्वाधिक चर्चिलेल्या हत्यांपैकी एक असलेले नीता नाईक हत्याप्रकरण देखील आता इतिहासजमा होईल.
गँगवॉर, आर्थिक व्यवहारांतील मतभेद, वैयक्तिक वैर आणि कौटुंबिक संशय अशा अनेक शक्यतांचा तपास पोलिसांनी केला. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि कटाचा संपूर्ण उलगडा आजतागायत झालेला नाही.
१३ नोव्हेंबर २००० रोजी आर्थर रोड परिसरातील ना. म. जोशी मार्गावरील सुभाषिस इमारतीत नीता नाईक यांच्यावर गोळीबार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबईच नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली होती. कारण त्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि कुख्यात गँगस्टर अश्विन नाईक यांच्या पत्नी म्हणूनही परिचित होत्या.
अंडरवर्ल्डमधील संघर्षाचा भडका उडाला आणि त्यातून नीता नाईक यांची हत्या झाली असावी या अंगाने पोलिसांनी तपास करून पाहिला. त्या काळात मुंबईतील विविध गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष सुरू होता. त्यामुळे नीता नाईक यांची हत्या हा त्या संघर्षाचाच भाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी गृहीत धरली. त्याशिवाय आर्थिक व्यवहार, खंडणी, मालमत्तेचे हितसंबंध आणि वैयक्तिक वैर या बाजूनेही पोलिसांनी तपास केला.
या प्रकरणात आणखी एक पैलू समोर आला होता. तो म्हणजे पोलीस लक्ष्मण झिमन यांची एक मुलाखत. 'नीता नाईक यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबध होते आणि त्याबद्दल अश्विन नाईकच्या मनात संशय निर्माण झाला होता.
त्यातूनच तिला संपविण्यात आले, 'असा संशय झिमन यांनी या मुलाखतीत व्यक्त केला होता. त्या शक्यतेचाही पोलिसांनी तपास केला, मात्र, नीता नाईक यांची हत्या याच कथित प्रकरणातून झाली असा झाल्याचा कोणताही न्यायालयीन निष्कर्ष नोंदविण्यात आलेला नाही. पोलीस तपास देखील त्या निष्कर्षापर्यंत पोहोचला नाही.
या प्रकरणात सहा जणांविरुद्ध खटला चालविण्यात आला. त्यापैकी तिघांना शिक्षा झाली. ज्याने नीता नाईक यांना गोळ्या घातल्या त्या सुनील जाधवला जन्मठेप झाली. कारण गोळ्या त्यानेच घातल्या हे सिद्ध झाले. पण गोळ्या का घातल्या, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. अन्य दोन आरोपींना कटात सहभागी झाल्याबद्दल कारावास झाला. पण हा कट कुणी आणि का रचला, याचे उत्तर पोलिसांना काही मिळवता आलेले नाही.
प्रश्न आजही कायम
नीता नाईक यांचा नवरा अश्विन नाईक, किशोर राजपूत यांची वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्दोष मुक्तता झाली. कारागृहात असताना हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अश्विन नाईकला अटक करण्यात आली होती.
मात्र, २००९ मध्ये पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यातील फरार आरोपी धर्मेंद्रसिंग चौधरी उर्फ धर्मेश यालाही गेल्या १४ जुलै २०२६ रोजी विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आणि हा खटला अखेर संपला.नीता नाईक यांची
हत्या का झाली हा प्रश्न मागे तसाच आहे. हत्येमागील नेमका सूत्रधार, कटाचे संपूर्ण स्वरूप आणि खरे कारण याबाबतचे प्रश्न आजही कायम आहेत.
नीता जेठवा ते नीता नाईक
गुजराती व्यापारी कुटुंबातील नीता जेठवा या सुशिक्षित तरुणी होत्या. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अश्विन नाईकच्या प्रेमात पडून त्यांनी समाजातील विरोधाची पर्वा न करता प्रेमविवाह केला आणि 'नीता नाईक' म्हणून नवे आयुष्य सुरू केले. पुढे अश्विन नाईकचे नाव मुंबईतील अंडरवर्ल्डशी जोडले गेले.
१९९६ मध्ये त्याचा भाऊ अमर नाईक एन्काउंटरमध्ये ठार झाल्यानंतर नाईक टोळीची सूत्रे अश्विनकडे आल्याचे मानले जाते. या काळात नीता नाईक यांनी पती म्हणून अश्विनला साथ देतानाच शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. ज्या नात्यासाठी तिने आयुष्य पणाला लावले, त्याच आयुष्याचा शेवट रक्तरंजित हत्येने झाला. नीता नाईक यांची कहाणी ही केवळ अंडरवर्ल्डची नाही, तर प्रेम, संघर्ष, राजकारण आणि गूढ मृत्यूने अखेर झालेली शोकांतिका ठरते.
हत्येचा सूत्रधार कोण?
१४ जुलै २०२६ रोजी विशेष न्यायालयाने फरार
आरोपी धर्मेंद्रसिंग चौधरी उर्फ धर्मेश याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यापूर्वी अश्विन नाईक आणि किशोर राजपूत यांनाही निर्दोष मुक्तता मिळाली होती. त्यामुळे या खटल्यातील न्यायालयीन प्रक्रिया जवळपास पूर्ण
झाली असली, तरी नीता नाईक यांच्या हत्येमागील मूळ
हेतू आणि कटाचा सूत्रधार कोण होता, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
दोषी आरोपी
सुनील जाधव (शूटर) : जन्मठेपेची शिक्षा.
मनोज भालेकर : कटात सहभाग; ७ वर्षांची शिक्षा.
नीलरतन मुखर्जी : कटात सहभाग; ५ वर्षांची शिक्षा.
निर्दोष मुक्त
अश्विन नाईक : २००९ मध्ये पुराव्याअभावी निर्दोष.
किशोर राजपूत : २००९ मध्ये निर्दोष.
धर्मेंद्रसिंग चौधरी उर्फ धर्मेश (फरार आरोपी) : १४ जुलै २०२६