मुंबई /नवी दिल्ली : जमिनीच्या पृष्ठभागाखाली अधिवास असणाऱ्या ‘वाम’ माशाच्या एका नव्या कुळाचा आणि प्रजातीचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना मोठे यश आले आहे. उत्तर भारतातील सिंधू-गंगा नद्यांच्या खोऱ्यातून ही प्रजाती शोधण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा मासा जमिनीखाली ओलसर भागात राहतो.
हातपंपातून पाण्यासोबत एक विलक्षण, रंगहीन मासा बाहेर येत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या (टीडब्ल्यूएफ) संशोधकांचे लक्ष वेधले. जुन्या नोंदी तपासल्यानंतर सिंधू-गंगेच्या खोऱ्यात अशी कोणतीही प्रजाती ज्ञात नसल्याचे समोर आले. या संशोधनात ‘टीडब्ल्यूएफ’चे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, ईशान अगरवाल यांच्यासह ‘चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्स’चे यू हे आणि ‘झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चे अनिल मोहोपात्रा यांचा सहभाग आहे.
गंगा नदीच्या नावावरून आणि ग्रीक शब्दाच्या जोडणीतून या नव्या कुळाला ‘गंगायईक्तिस’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच, ही प्रजाती बिहारमधील नेपाळ सीमेजवळ सापडल्याने तिचे नामकरण ‘गंगायईक्तिस इंडोनेपालीकस’ असे करण्यात आले आहे. जमिनीतील वास्तव्यामुळे या माशाला शोधणे अत्यंत आव्हानात्मक होते.
संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले की, पहिला मासा मिळवण्यासाठी हातपंपातून तब्बल दोन हजार लिटर, तर दुसऱ्या माशासाठी ५०० लिटर पाणी हाताने उपसावे लागले. तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल यांनी या शोधाचे महत्त्व विशद करताना, सिंधू-गंगा खोऱ्यात जमिनीखालील माशांची ही पहिलीच नोंद असल्याचे स्पष्ट केले.
कसा आहे नवा मासा?
या माशाची लांबी साधारणतः ४०.६ मिलिमीटर (४ सेंटिमीटर) आहे.
त्वचेखाली झाकलेले अविकसित डोळे, रंगहीन शरीर असते.
हा मासा सिंधू-गंगा खोऱ्यात आढळतो.
भारत-नेपाळ सीमेजवळ आढळलेल्या या प्रजातीला दिले ‘इंडोनेपालीकस’ नाव.
जमिनीच्या पृष्ठभागाखाली वावरणारी माशाची नवी प्रजाती भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात आढळून आली. ‘इंडोनेपालीकस’ हे माशाला दिलेले नाव तिचे आढळक्षेत्र दर्शविते.तेजस ठाकरे, संस्थापक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन