मेमध्ये नवी मुंबईचे टेक ऑफ file photo
मुंबई

मेमध्ये नवी मुंबईचे टेक ऑफ

एप्रिलमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या विमानतळाचे शानदार उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : पुढारी डेक्स : २०२४ च्या मावळतीला विमानांच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यामुळे नव्या वर्षात एप्रिल ते मेदरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली धावपट्टी सुरू होईल, असा अंदाज आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज ही कंपनी नवी मुंबई विमानतळाची उभारणी करत आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार मे २०२५ मध्ये या विमानतळावरून विमाने उड्डान घेतील. व्यावसायिक प्रवासी आणि मालवाहतूक सुरू होईल. तत्पूर्वी एप्रिलमध्ये या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे उद्घाटन अपेक्षित आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार या उद्घाटनाचा मुहूर्तही निश्चित झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ एप्रिल २०२५ रोजी हा उ‌द्घाटन सोहळा होऊ शकतो. पहिल्या टर्मिनलमध्ये वर्षाला २ कोटी प्रवासी ये-जा करतील इतकी क्षमता असेल. या विमानतळाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर हीच क्षमता वर्षाला ९ कोटी प्रवाशांपर्यंत वाढेल. या विमानतळाला दोन समांतर धावपट्ट्या असतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा नवी मुंबई विमानतळाची क्षमता अधिक असेल. आतापर्यंत नवी मुंबई विमानतळावर विमान उड्डाणाच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या. साधरणतः लष्करी विमानाचे उतरणे किंवा उड्डाण हा कोणत्याही विमानतळाच्या चाचणीचा निकष मानला जात नाही. तरीही सुखोईसारखे विमान इथे यशस्वी उतरवले गेले. गेल्या रविवारी प्रथमच इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबईच्या धावपट्टीवर उतरले. नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षातून या चाचणीचे संयुक्त नियंत्रण करण्यात आले. ही अंतिम चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता या विमानतळाला २०२५मध्ये होणाऱ्या उद्घाटनाचे वेध लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT