मुंबई: नीट-यूजी परीक्षेत यंदा राज्यातील तब्बल १ लाख १३ हजार ९९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, नीटच्या माध्यमातून प्रवेश होणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सुमारे २५ हजार जागांसाठीच हे विद्यार्थी स्पर्धा करणार आहेत.
त्यामुळे यंदाही वैद्यकीय प्रवेशात तीव्र चुरस अपेक्षित असून, विशेषतः मुंबई, पुण्यासह राज्यातील आघाडीच्या सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी 'काँटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. गुणवत्तेसोबतच ऑल इंडिया रँक, पसंतीक्रम व समुपदेशन प्रक्रियाही प्रवेशासाठी निर्णायक ठरणार आहे.
गुण नव्हे, पसंतीक्रमही महत्त्वाचा
वैद्यकीय प्रवेशाचा अंतिम निर्णय केवळ गुणांवर होणार नाही. ऑल इंडिया रँक, आरक्षण, राज्य व अखिल भारतीय कोटा, विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम, उपलब्ध जागा आणि समुपदेशनाच्या प्रत्येक फेरीतील बदल यावर अंतिम प्रवेश निश्चित होणार आहे.
त्यामुळे निकालानंतरची समुपदेशन प्रक्रिया हा विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, पसंतीक्रम भरताना प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेण्याची गरज आहे.
प्रश्नपत्रिका तुलनेने कठीण गेल्याने गुणवत्ता यादी काहीशी खाली आली आहे. तसेच यंदाच्या नीट-यूजी निकालात रिपीटर विद्यार्थ्यांचे वर्चस्व कमी झाल्याचे दिसून येते.
देशातील अव्वल १३८ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९३ टक्के विद्यार्थी नियमित (रेग्युलर) असून केवळ ७ टक्के रिपीटर आहेत. यावरून नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी अधिक प्रभावी ठरल्याचे दिसते, असे 'डीपर'चे संस्थापक हरिष बुटले यांनी सांगितले.