मुंबई : देशभरातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणार्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असणार्या नीट-पीजी 2025 परीक्षेचा निकाल 3 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे.
यंदा ही परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. देशभरातील 301 शहरांतील तब्बल 1 हजार 52 केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 2 लाख 42 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून तो पीडीएफ स्वरूपात उपलब्ध राहील. निकालपत्रात उमेदवारांचा अर्ज क्रमांक, रोल नंबर, पर्सेंटाइल आणि एकूण गुणवत्ता क्रमवारी नमूद असेल. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच गुणपत्रक डाउनलोड करण्यासाठी स्वतंत्र सुविधा असणार आहे.
या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा, पोस्ट-एमबीबीएस डीएनबी, सहा वर्षांचा थेट डीआरएनबी तसेच एनबीईएमएस डिप्लोमा अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.