मुंबई : देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचा थेट परिणाम राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या काही अभियांत्रिकी शाखांच्या प्रवेशासाठी नीटचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने, नीटची पुनर्परीक्षा आणि त्यानंतरचा निकाल लागेपर्यंत या प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी दोन वेळा सीईटी घेऊन विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेऊनही गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ चार ते पाच दिवस उशिराने निकाल जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जूनअखेरीस प्रवेश प्रक्रियेच्या कॅप फेऱ्या सुरू करण्याची तयारीही करण्यात आली होती. मात्र नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे हे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी पीसीएम सीईटीचा निकाल 15 जूनला जाहीर झाला होता. यंदा दोन परीक्षा घेऊनही दुसऱ्या सीईटीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर करण्याची तयारी आहे. मात्र राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला घेतली जाणार असून त्यानंतर निकाल लागण्यासाठी आणखी कालावधी लागेल. त्यामुळे जुलैच्या मध्यापूर्वी नीटचा निकाल अपेक्षित नाही.
परिणामी अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलावी लागणार असल्याचेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. अभियांत्रिकीच्या काही शाखांमध्ये नीटचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने त्या शाखा वगळून स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्या अभ्यासक्रमांची प्रवेशाला बसणार फटका
कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री या बी.टेक.च्या नऊ शाखांमध्ये नीटचे गुण ग्राह्य धरले जातात. तसेच बी.फार्मसी अभ्यासक्रमातील अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागांचे प्रवेशही नीट गुणांच्या आधारेच दिले जात असल्याने या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.
नीट पुनर्परीक्षा, निकाल आणि त्यानंतरची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्यातील अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेश फेऱ्या सुरू करण्यात अडचणी निर्माण होणार.
वैद्यकीय शिक्षणाऐवजी अभियांत्रिकीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा अंतिम कल स्पष्ट होण्यास उशीर झाल्याने महाविद्यालयांना प्रवेश निश्चितीचे नियोजन करता येणार नाही.
नीट गुणांवर आधारित अभियांत्रिकीच्या नऊ शाखा आणि फार्मसीच्या अखिल भारतीय कोट्यातील जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मंदावणार.